Ghe Bharari
Ghe Bharari

घे भरारी

कवी
डॉ. अमित झपाटे, नागपूर.

Ghe Bharari

धर्मशास्त्राच्या बुडाखालची धगधगती तू आग आहेस,
गुलामीच्या शृंखलेची तूच अर्धा भाग आहेस,
गर्जून ऊठू दे आवाज तुझा गं, या सडक्या व्यवस्थेवर,
भीड धरुनी काय फायदा, तुझ्या या अवस्थेवर,
बंड कर तू त्वेषाने, दे जवाब करारी,
न्यायासाठी आता, घे भरारी घे भरारी…

संस्कृतीच्या नावाखाली, पुरते लुटले तुला गं,
चूल मुलाच्या बंधनात, पुरते कुटले तुला गं,
घिरट्या घालतात आजही, लचाट सारी घुबडे,
भीतीच्या या आवरणात, भविष्य तुझे सडे,
झुंज देण्या रणमैदानी, कर तू आता तय्यारी,
स्त्री जातीच्या हक्कासाठी, घे भरारी घे भरारी…

भावनांचा बांध बांधूनी, रक्त तुझे हे गोठवतील,
मासधर्माची जाण देऊनी, आजही तुला बाटवतील,
चंद्र तारे राजा राणी, हे भिकार जिने सोडून दे,
ज्ञानसाधना अंगी भिनऊन, नर सत्तेला मोडून दे,
आंधळे बनून स्वीकारू नकोस, ही दस्यत्वाची लाचारी,
स्व: हिताच्या रक्षणासाठी, घे भरारी घे भरारी…

मी पाहिले असंख्य रूप तुझे, दुसऱ्यासाठी जळतांना,
हृदयात घाव होतो जेव्हा, दिसतेस तू पोळतांना,
तलवार उपस त्या शिवबाची, क्रांती ज्योतीला सोबत घे,
शालीनतेचा साज घेऊनी, अवघे विश्व कवेत घे,
भीमरायाला घडविणारी, बन अशी रमाई,
संविधानाची कूस राखण्या, घे भरारी घे भरारी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here