‘तेव्हाची सीबीआय राजकीय हेतूने प्रेरित’

52

मुंबई- सोहराबुद्दीन शेख चकमकीच्या प्रकरणाला तेव्हाच्या राजकीय हेतूने प्रेरित ‘सीबीआय’ने जाणीवपूर्वक तापवले आणि आताची ‘सीबीआय’ संतुलित असल्याने न्यायालयासमोर योग्य भूमिका मांडत आहे, असा दावा एका आयपीएस अधिकाऱ्याच्या वतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात मांडला.
सोहराबुद्दीन खटल्यातील काही आरोपींना आरोपमुक्त करण्याच्या सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सीबीआय व सोहराबुद्दीनचे भाऊ रुबाबुद्दीन यांनी अर्जांद्वारे आव्हान दिले आहे. त्याविषयी न्या. रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर दोन आठवड्यांपासून दररोज सुनावणी सुरू आहे. सीबीआय सहकार्य करत असल्याने न्यायालयाला अजूनही या प्रकरणातील सीबीआयची भूमिका स्पष्ट झालेली नाही, अशा शब्दांत न्यायालयाने यापूर्वी नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर, आरोपमुक्त करण्यात आलेले आयपीएस अधिकारी राजकुमार पांडियन यांच्यातर्फे युक्तिवाद करताना, सोहराबुद्दीन हा दाऊद इब्राहिमशी संपर्कात असलेला दहशतवादी होता आणि त्याच्याविरोधात अनेक देशविघातक कृत्यांप्रकरणी गुन्हे दाखल होते, असा दावा जेठमलानी यांनी केला. ‘पोलिस सोहराबुद्दीनच्या मागावर होते आणि अखेर त्याला २००५मध्ये अटक झाली. नंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला असावा. मात्र तेव्हाच्या राजकीय हेतूने प्रेरित सीबीआयने याला बनावट चकमकीचा रंग दिला’, असा दावा जेठमलानी यांनी केला. तेव्हा न्यायमूर्तींच्या प्रश्नावर आताची सीबीआय ही संतुलित असल्याची मल्लिनाथीही त्यांनी केली. त्यावर ‘संतुलित असल्याने आता न्यायालयाला सहकार्य करण्यास सीबीआय नकार देत आहे का’, असा उपरोधिक सवाल न्यायमूर्तींनी केला.