विधवा महिला आणि अविवाहित तरुण, नदीत उडी घेऊन प्रेमी युगुलाची आत्महत्या.
✒भंडारा जिल्हा प्रतिनिधी✒
भंडारा, दि.11 मार्च:- येथून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. प्रेम प्रकरणातून विधवा महिलेसह एका अविवाहित तरूणाने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना भंडारा येथील निर्वाण घाटावर गुरूवारी दुपारी 3.30 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार कुंदा रमेश कुंभलकर वय 33 वर्ष आणि नाशिक महादेव बावनकुळे वय 28 वर्ष रा. शुक्रवारी भंडारा अशी मृतांची नावे आहे. हे दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार भंडारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. दरम्यान गुरूवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीच्या दिवाणघाटावर महिलेचा मृतदेह आढळून आला. तिची ओळख पटविली असता ती कुंदा कुंभलकर असल्याचे पुढे आले. त्याच परिसरात पोलिसांनी शोध घेतला असता दुपारी 3.30 वाजता नाशिकचाही मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दोनही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले आहे. कुंदा ही एका किराणा दुकानात कामाला होती. तिला 14 वर्षाचा मुलगा आणि 11 वर्षाची मुलगी आहे. तर नाशिकचे भाजीपाल्याचे दुकान असून तो अविवाहीत आहे.