यवतमाळ जिल्हा बैंकेत 89 लाखांची अफरातफर, 4 कर्मचा-यांवर गुन्हा दाखल.

53

यवतमाळ जिल्हा बैंकेत 89 लाखांची अफरातफर, 4 कर्मचा-यांवर गुन्हा दाखल.

Fraud of Rs 89 lakh in Yavatmal District Bank, case filed against 4 employees.

✒साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी ✒
यवतमाळ,दि.19 मार्च:- यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आर्णी शाखेतील 89 लाख रुपयांच्या अफरातफर झाल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. अफरातफर करणारा 4 कर्मचा-यांवर अखेर बुधवारी रात्री विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या आरोपींच्या शोधात आहेत.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बैंक आर्णी शाखेचे व्यवस्थापक रणजित मधुकर गिरी यांनी आर्णी पोलीस ठाण्यात ही फिर्याद नोंदविली. 2018 पासून 12 मार्च 2021 पर्यंत प्राथमिक लेखापरीक्षणात 89 लाख 27 हजार 501 रुपयांची अफरातफर झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यावरून भादंवि 406, 409, 420, 467, 468, 469, 471, 477 व 34 या कलमान्वये पोलिसात गुन्हा दाखल केला गेला. त्यात आर्णी शाखेच्या व्यवस्थापक योगीता सुनील पुसनायके 45 वर्ष रा. यवतमाळ, लेखापाल अमोल पांडुरंग मुजमुले 43 वर्ष रा. जवळा ता. आर्णी, रोखपाल विजय खुशालराव गवई 52 वर्ष रा. यवतमाळ व अंकित दीपक मिरासे 35 वर्ष रा. सुकळी ता. आर्णी यांना आरोपी बनविण्यात आले आहे.

विशेष असे गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर संचालक मंडळाने तिघांना तडकाफडकी निलंबित केले होते. तर कंत्राटी असलेल्या अंकितची सेवा समाप्त केली होती. या आरोपींनी संगनमताने 25 ग्राहकांच्या बॅंक खात्यातून रक्कम काढणे, त्यासाठी विड्रॉल स्लीप, चेक स्लीप याच्यावर खाडाखोड करणे, खोटे दस्तावेज तयार करणे, ते खरे म्हणून वापरणे, ग्राहकांच्या बचत खाते पुस्तकावर स्व:हस्ते एन्ट्री करून खोटे हिशेब तयार करणे, बॅंकेची फसवणूक करून न्यायभंग करणे, बॅंकेच्या खातेधारकांना ठगविणे आदी ठपका पोलिसातील तक्रारीत ठेवण्यात आला आहे. महिला सहायक फौजदार अलकनंदा काळे यांनी ही फिर्याद नोंदवून घेतली असून आर्णीचे ठाणेदार पितांबर जाधव या गुन्ह्याचा तपास करीत आहे. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत.