Administration's readiness is commendable, but Corona's seriousness should not be diminished: Guardian Secretary Anup Kumar
Administration's readiness is commendable, but Corona's seriousness should not be diminished: Guardian Secretary Anup Kumar

प्रशासनाची तयारी अभिनंदनीय, पण कोरोनाचे गांभीर्य कमी होऊ नये :पालक सचिव अनुप कुमार

एसएमएसची वाट न पाहता 28 दिवसानंतर दुसरा डोज घ्यावा. लस सुरक्षीत, अपप्रचाराला बळी पडू नये.

लोकसंख्येच्या तुलनेत वाढीव लससाठा मिळण्याबाबत मुद्दा मांडणार. मास्क मोहिम, तपासणी वाढवा, मास्क न वापरणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीसांची कॅमेराद्वारे नजर

सुपरस्प्रेडरची तपासणी, कॉन्टॅक्ट ट्रेसींग व प्रतिबंधीत क्षेत्र वाढविण्याचे निर्देश

 Administration's readiness is commendable, but Corona's seriousness should not be diminished: Guardian Secretary Anup Kumar

✒मनोज खोब्रागडे✒
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 19 मार्च :- नागपूर, अमरावती व लगतच्या जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असतांना चंद्रपूर जिल्ह्यात त्या तुलनेत रुग्ण संख्या नियंत्रणात आहे. प्रशासनाने कोरोनाविरूद्ध आखलेल्या उपाययोजना व दुसऱ्या लाटेच्या अनुषंगाने केलेली पुर्वतयारी चांगली असून सध्यातरी त्यात कोणतीही कमतरता दिसून येत नाही, मात्र कोरोनाचे गांभीर्य कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ देऊ नका असे मत चंद्रपूर जिल्ह्याचे पालक सचिव अनुप कुमार यांनी आज व्यक्त केले.

पालक सचिव अनुप कुमार यांनी आज चंद्रपूर जिल्ह्याच्या कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनेसंबधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वीस कलमी सभागृहात आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस आयुक्त अरविंद साळवे, महानगरपालीका आयुक्त राजेश मोहिते, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

पालक सचिव अनुप कुमार पुढे म्हणाले की कोरोनाच्या दोन्ही लस पुर्णता सुरक्षीत असून जागतीक आरोग्य संघटना व इतर जबाबदार संस्थांची त्याला मान्यता आहे. भारतीय बनावटीची लस जगातील अनेक देशामध्ये निर्यात करण्यात आली असून लस संबंधीच्या कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये. काही नागरिकांना कोरोना लस चा पहिला डोज घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोज घेण्याबाबत संगणकीय प्रणालीतील अडचणीमुळे एस.एम.एस. प्राप्त झाला नसला तरी त्यांनी संबंधीत लसीकरण केंद्रावर थेट जाऊन दुसरा डोज घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

नागपूर विभागात सर्व जिल्ह्यांना सारख्या प्रमाणात लस उपलबध करून देण्यात येत आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्याची लोकसंख्या इतर जिल्ह्याच्या मानाने जास्त असून चंद्रपूरकरिता वाढीव लस साठा मिळावा, अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी केली असता लोकसंख्येच्या तुलनेत चंद्रपूरला वाढीव लस साठा वितरीत करण्याबाबत मुख्य सचिवांकडे मुद्दा मांडून पाठपुरावा करण्यात येईल, असेही अनुप कुमार यांनी स्पष्ट केले.

कोरोनापासून बचावासाठी मास्क मोहिम अधिक जोरकसपणे राबविण्याची आवश्यकता असल्याचे अनुप कुमार यांनी सांगितले. वाहतुक पोलीसांमार्फत मास्क न वापरणाऱ्या वाहनचालकांना त्यांच्या वाहन क्रमांकाचे मोबाइलद्वारे छायाचित्र घेवून त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी पोलीस अधिक्षक साळवे यांना दिल्या.

जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी ‘माझे कार्यक्षेत्र माझी जबाबदारी’ ही विशेष मोहिम राबवून स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने कोरोनाविरूद्ध जनजागृती करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच जिल्ह्यात सर्वाधिक कोविड रुग्णांच्या 10 टक्के अधिक रूग्णसंख्येच्या अनुषंगाने दुसऱ्या लाटेविरूद्ध प्रशासनाने पुर्ण तयारी केली असल्याचे सांगितले.

यावेळी पालक सचिव अनुप कुमार शहरी भागात जास्त घनतेच्या लोकवस्तीमध्ये कोरोनाची स्थिती व उपाययोजना तसेच आरोग्य यंत्रणेमार्फत घरोघरी जाऊन सुरू असलेल्या तपासणीबाबत, शाळा, कॉलेज, वस्तीगृह येथील स्थिती, ग्रामीण भागात ॲम्ब्युलन्सची उपलब्धता आरोग्य सेवक व कोरोना फ्रंटलाईन वर्कर यांचे लसीकरण याबाबतदेखील त्यांनी आढावा घेतला. तसेच जिल्ह्यात सुपरस्प्रेडरची कोरोना टेस्टींग, कॉन्टॅक्ट ट्रेसींग व प्रतिबंधीत क्षेत्र वाढविण्याबाबत व त्यासंबंधाने आवश्यक उपायोजना करण्याबाबतचे निर्देश प्रशासनाला दिले.

याप्रसंगी जिल्हा लसीकरण अधिकारी संदिप गेडाम, आरोग्य अधिकारी डॉ. सुधीर मेश्राम व इतर संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here