7 व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आभासी उद्घाटन.
शेतकरी गरीब अन् कारखानदार श्रीमंत असा प्रश्न मराठी साहित्याला कधी पडेल : वसुंधरा काशीकर
✒आशीष अंबादे प्रतिनिधि✒
वर्धा,दि.20 मार्च:- एका दाण्याचे हजार दाणे करणारा शेतकरी दरिद्री आणि एका किलोचं सव्वा किलोही लोखंड करू न शकणारा कारखानदार मात्र श्रीमंत हे काय गणित आहे, असा शेतीच्या समस्येच्या मूलभूत समस्येला हात घालणारा प्रश्न मराठी साहित्याला का पडत नाही, असा प्रश्न उपस्थित करत वसुंधरा काशीकर यांनी मराठी साहित्य विश्वाने यापुढे तरी शेतीमातीच्या प्रश्नांशी सुसंगत लेखन करण्यास सज्ज व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. सातव्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या आज 20 रोजी रोजी आयोजित आभासी उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानाहून वसुंधरा काशीकर बोलत होत्या.
कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता रावेरी येथील शनिवार, रविवार 20 व 21 मार्च रोजी नियोजित 7 वे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन रद्द करण्यात आले. संमेलनाचे नव्याने नियोजन करून सुधारित स्वरूपात नाईलाजाने आभासी पटलावरून सम्मेलन सप्ताह घेण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला. त्यातील पहिले चरण म्हणून आज 20 रोजी आभासी उद्घाटन करण्यात आले. मराठी साहित्याचा अभ्यास केला तर मराठी साहित्याने शेतकर्यांच्या दु:खाची व समस्यांची नगण्य म्हणता येईल अशी दखल घेतली आहे. काही अपवाद सोडले तर सर्वसामान्यपणे लेखकांचे, कवींचे लिखाणाचे विषय हे मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, शहरी जीवनाचं चित्रीकरण करणारे दिसतात. ग्रामीण भागाचं चित्रीकरण आलं असलं तरी त्यात शेतकरी फारसा दिसत नाही, समाजाला काही विचार-मूल्य देणे, रंजन करणे आणि सामाजिक बांधिलकी हे साहित्याचे उद्देश मानले तर मराठी साहित्य त्या कसोटीवर कुठे उभे आहे याचा विचार करायला हवा, असेही वसुंधरा काशीकर म्हणाल्या.
बीजभाषण करताना संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे म्हणाले, शेतीच्या वेदनांवर हजारो वर्षांपासून कुणी बोललेच नाही. आजचा प्रतिष्ठित व नामवंत लेखक जर आजही पिढ्यानपिढ्याच्या अबोलतेवर बोलताच झाला नसेल, त्यांना शेतीचे मूलभूत समस्याच कळाल्या नसेल तर आजचा शेतीसाहित्यिकाही मुकाच आहे आणि त्याचे डझनभर पुस्तके सुद्धा मुकीच असल्याचे मुटे म्हणाले. संमेलनाचे उद्घाटन शेतकरी नेत्या सरोज काशीकर यांनी केले. संचालन प्रा. मनीषा रिठे यांनी केले. लक्ष्मी बल्की व राजेंद्र झोटींग प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.