नागपुर: महाविद्यालयाकडुन विद्यार्थ्याची लूटेचा गोरखधंदा; परतावा शुल्कातून लाखोंची कमाई.

✒युवराज मेश्राम ✒
नागपुर जिल्हा प्रतिनिधी
📲 95275 26914
नागपूर :- नागपुर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांद्वारे विद्यार्थ्यांकडून दरवर्षी प्रवेशाच्या वेळी अतिरिक्त शुल्क (कॉशन मनी) आकारण्यात येत असते. ते शुल्क अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर परत करणे बंधनकारक आहे. मात्र, शुल्क परत न करता महाविद्यालयांनी कमाईचा गोरखधंदा सुरू केल्याची माहिती समोर आली.
नागपुर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयाची संख्या साडेपाचशेहून अधिक आहे. त्यात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला 75 रुपये ‘कॉशन शुल्क’ भरावे लागते. याशिवाय ग्रंथालय व ज्या महाविद्यालयांमध्ये प्रयोगशाळा आहेत, त्यासाठी विद्यार्थ्याकडून 200 ते 500 रुपये असे प्रत्येक विद्यार्थ्याकडून शुल्क आकारण्यात येते. विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर ‘कॉशन मनी’ परताव्याच्या स्वरूपात देणे बंधनकारक आहे. असे असताना दरवर्षी स्वीकारण्यात येणाऱ्या शुल्काचा परतावा आजपर्यंत विद्यार्थ्यांना मिळालेला नाही.
विशेष म्हणजे, विद्यापीठात पाच लाखांहून अधिक विद्यार्थी शिकतात. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयातील विद्यार्थी संख्येचा विचार केल्यास ही रक्कम दरवर्षी 3 ते 4 लाखांच्या घरात असते. त्यामुळे महाविद्यालये मालामाल होत असल्याचे दिसते.
आदेशाला केराची टोपली
विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे शुल्क परत करण्यासाठी विद्यार्थी संघटनांच्या माध्यमातून तक्रारी करण्यात आल्या. त्यावरून यंदापासून ‘कॉशन मनी’ विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येऊ नये असे महाविद्यालयांना पत्राद्वारे कळविण्यात आले. मात्र, त्या पत्राला केराची टोपली दाखवीत, यंदाही अशा प्रकारचे शुल्क आकारण्यात आले.
काय आहे ‘कॉशन मनी’?
विद्यार्थ्याने प्रवेश घेताना त्याच्या पावतीवर ‘कॉशन मनी’पोटी 75 रुपये आकारण्यात येतात. याशिवाय त्याने ग्रंथालयातील पुस्तक परत न दिल्यास आणि प्रयोगशाळेमध्ये काही साहित्याची मोडतोड केल्यास त्यासाठी शुल्क आकारण्यात येते. मात्र, ती रक्कम आगाऊ स्वरूपात घेण्यात येते. मात्र, बहुतांश विद्यार्थ्यांकडून नुकसान होत नसल्याचे दिसून येते.








