मी, सावित्री आईची लेक…
संगीता संतोष ठलाल
मु.कुरखेडा जि.गडचिरोली
मो: ७८२१८१६४८५
सवित्री आई आज तुझी जयंती आहे ग तुझ्या जंयती निमित्ताने तुला कोटी, कोटी विनम्र अभिवादन करते.ज्या माझ्या आई,वडीलांनी महा जन्म देऊन मोठ्या कष्टाने लहान्याचे मोठे केले,माझ्यावर संस्कार केले व सुंदर असे मला जग दाखवले ,या जगात कसे जगले पाहिजेत याची मला त्यांनी जाणीव करून दिली तेही माझ्यासाठी वंदनीय, दैवत, गुरू आहेत त्यांनाही मी वंदन करते. त्यांच्यासारखी तू सुद्धा माझ्यासाठी वंदनीय, पुज्यनिय आहेस. आज तुझ्या अफाट कष्टामुळे, संघर्षामुळे, त्यागामुळे मला दोन वर्ग शाळा शिकता आले.
मला दोन शब्द बोलण्याची संधी मिळत आहे, आज तुझ्या शिकवणीतून वेडेवाकडे दोन ओळी लिहायला मी शिकली आहे. आणि ते, दोन ओळी लिहिलेले समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. व खऱ्या अर्थाने यातच मला समाधान आहे. कारण, तुझ्या महान कार्यासमोर मी शुन्य आहे. शिक्षणासोबतच महिलांनी कसे वागले पाहिजे, जीवन कशाप्रकारे जगले पाहिजे, आचार, विचार कसे ठेवले पाहिजे याची सुद्धा मला शिकवण दिली आहेस खरच सावित्री आई आज तुझी लेक होण्याचा मला अभिमान वाटतो ग.तुझ्या फोटोकडे बघितल्यावर तुझी महानता, संघर्ष, ज्ञान, त्याग, समाजसेवा, साधीरहाणीमान या साऱ्या गोष्टी अगदी स्पष्टपणे दिसून येतात ग सावित्री आई आज तुझ्या कष्टांमुळे मला समाजात थोडाफार तरी मान मिळत आहे. हे, मी कधीही विसरू शकत नाही.
एखाद्या वेळी मला कार्यक्रमात आमंत्रित केल्या जाते त्यावेळी तुझ्या प्रतिमेचे पूजन करायला मिळते तेव्हा, अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू येतात ग आई तू किती महान विभूती आहेस ग ..? आज सारा विश्व तुला वंदन करत आहे. तुझ्या महान समाजकार्याला, तुझ्या अफाट कष्टाला, तुझ्यात असलेल्या माणुसकी धर्माला तुझ्यासारखी महान स्त्री शक्ती या जगात पुन्हा दुसरी कोणतीही होऊ शकत नाही. सावित्री आई तुझी महानता व तुझे समाजकार्य हे अजरामर आहेत पण, याच समाजातील,व भारत देशातील मुलींसाठी , महिलांसाठी तुम्ही शिक्षणाचे दार उघडले न त्यावेळी हे महान कार्य पाहून लखलखत्या सूर्याच्या डोळ्यात सुध्दा अश्रू आले. पण, कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात दु:खही वाटते ग आज तुझ्या प्रत्येक लेकी अनेक क्षेत्रात जाऊन सुद्धा कुठेतरी मागे आहेत कोणी सुशिक्षित झाल्या पण पूर्णपणे जागृत झाल्या नाहीत दररोज टीव्ही व मोबाईलच्या नादी लागून उगाचच वेळ वाया घालवत असतात.
महिलांच्या विषयी वृतपत्रातील काही बातम्या वाचून अंगावर काटे उभे होत असतात. काही लेकी अंधश्रद्धेच्या आहारी जावून सर्वस्व गमावतात. लेकी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रस्थापितांच्या पाया पडून आपला स्वाभिमान सुद्धा विकायला मागे, पुढे बघत नाही. काही लेकी, नको त्या मार्गाने जात आहेत. हे,सर्व बघताना खूप दु:ख होते ग तिथेच तुझ्या काही लेकी अशा आहेत की, नि:स्वार्थ भावनेने कार्य करत असतात मात्र त्यांची कोणीही दखल घेत नाही. तरीही त्या समाधानी असतात. आपले कार्य चालूच ठेवतात. आणि असेच समाजासाठी योगदान देत रहावे.
समाजात राहणाऱ्या महिला कशाही वागोत तो, ज्यांचा, त्यांचा प्रश्न आहे. मी, कोण होते म्हणणारी..?पण, सावित्री आई मी तुझी लेक आहे ग ज्या परिस्थितीत मी आहे तिथेच मी समाधानी आहे तू दाखविलेल्या मार्गावर चालत आहे आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहणार आहे.
मी कोणत्याही प्रस्थापितांच्या मुळीच पाया पडणार नाही. व्यर्थ गोष्टींच्या नादी लागून सोन्यासारख्या जीवनाची माती करणार नाही. जे, समाजासाठी माझ्या हातून कार्य घडतील ते, मी करतच राहणार आहे. संघर्षाच्या वाटेवरून चालत राहणार आहे. नेहमीच सत्य बोलत राहीन, त्याच प्रमाणे तू ज्या प्रकारचे शिक्षण मला दिले आहेस ते शिक्षण मी आत्मसात करून आचरणात आणण्यासाठी सदैव प्रयत्न करणार आहे. कारण तुझ्या कष्टाची मला जाणीव आहे. ते सर्व विसरणे माझ्याने होत नाही.