माहूर दत्त जयंती यात्रेत वाहतूक गोंधळाचा शिखरबिंदू; भाविकांचा संताप उसळला

66

महिला भाविकांचा एसटीवर चढून अनोखा रोष प्रदर्शन — प्रशासनाच्या नियोजनात मोठी तफावत उघड

आदित्य खंदारे

श्रीक्षेत्र माहूर : यावर्षीच्या दत्त जयंती यात्रेला देशभरातून लाखो भाविकांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली. मात्र, या भाविकांची सोय करण्यासाठी अपेक्षित नियोजनात झालेल्या त्रुटीमुळे दुपारी वाहतूक व्यवस्थेचा पूर्णत: बोजवारा उडाला. तब्बल दोन तास उशिरा एसटी बसेस येत असल्याने हजारो भाविकांना गडावरच अडकून पडावे लागले. परिणामी भाविकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला.

या आंदोलनात महिला भाविकांचाही मोठा सहभाग होता. काही महिला तर थेट एसटीच्या काचांवर चढून निषेध नोंदवताना दिसल्या. भाविकांनी वाहन चालकांना हात दाखवून बस थांबविण्याचा प्रयत्न केला असता काही चालकांनी गाडी आंदोलकांच्या अगदी जवळ आणल्याचीही माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमा झाली होती.

भाविकांच्या म्हणण्यानुसार, गाड्यांची संख्या कमी, वाहतुकीचे नियोजन अपुरे, असल्याची या ठिकाणी जाणवले यामुळे यात्रेचा आनंद आणि भक्तीभावाऐवजी संभ्रम, राग आणि त्रास यालाच भाविकांना सामोरे जावे लागले.

प्रशासनाचे नियोजन कागदावरच?

उत्सवासाठी 50 एसटी बसेस आणि 200ते 250पोलिसांची नियुक्ती झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात या आकडेवारीचे कोणतेही प्रतिबिंब दिसून आले नाही, अशी भावना भाविकांनी व्यक्त केली. “आकडेवारीवरून उत्सव होत नाही, भाविकांच्या सोयी-सुविधा पाळल्या गेल्या पाहिजेत” असा सवाल आंदोलक भाविकांकडून करण्यात आला.

घटनास्थळी निर्माण झालेली परिस्थिती बिघडू नये म्हणून श्री रेणुका देवी संस्थानचे व्यवस्थापक नितीन गेडाम यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यांनी वाहतूक विभागाशी समन्वय साधत काही बसेसची अतिरिक्त व्यवस्था करून वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. परंतु भाविकांच्या रोषाचा ठिणगीसारखा परिणाम प्रशासनाच्या निष्क्रीयतेकडे स्पष्टपणे बोट दाखवणारा होता.

दोन दिवसीय उत्सव असल्याने नियोजनामध्ये पारदर्शकता असणे गरजेचे होते परंतु नियोजन अपुरे असल्याची या ठिकाणी प्रत्यक्ष पाहण्यात आले

दोन दिवस चालणाऱ्या या महत्त्वाच्या धार्मिक उत्सवासाठी वर्षभर नियोजन झाले असल्याचे सांगितले जाते. तरीही प्रत्यक्षात भाविकांच्या सोयी, पार्किंग, बसांची उपलब्धता, मार्गदर्शन पथके यामध्ये प्रशासकीय त्रुटी दिसून आल्या. “यात्रा मोठी, पण व्यवस्थापन छोटे” — अशा शब्दांत भाविकांनी नाराजी व्यक्त केली.

दत्त जयंतीसारख्या भव्य धार्मिक सोहळ्यात भाविकांना त्रास होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असून, आगामी वर्षी अशी परिस्थिती टाळण्यासाठी वाहतूक व सुरक्षेच्या नियोजनात आमूलाग्र बदल करण्याची गरज प्रकर्षाने जाणवते. प्रशासनाने यावर्षीचा अनुभव धडा म्हणून घेतला नाही, तर भविष्यातील यात्रेत अशी परिस्थिति आणखी बिकट होण्याची भीती व्यक्त होत आहे.