गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- गेल्या दहा महिन्यात महिला अत्याचार विरोधात रायगड जिल्ह्यात तब्बल 89 अर्जाची नोंद झाली आहे. घरगुती हिंसाचार, मानसिक छळ, आर्थिक शोषण तसेच कौटुंबिक वाद यासारख्या विविध कारणामुळे महिलांनी तक्रारी नोंदवल्या या प्रकरणावर भरोसा सेलने कारवाई केली असून अनेक प्रकरणात सकारात्मक समझोता करून कुटुंब एकत्र आले आहेत.
भरोसा सेलमध्ये नोंदवलेल्या अर्जापैकी 70 महिलांचे समुपदेशन करण्यात आले. पती-पत्नी मधील संवाद भाव, कौटुंबिक तणाव, व्यसनाधीनता,आर्थिक दडपण अशा कारणामुळे निर्माण झालेल्या समस्यावर समुपदेशकांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून समेटाचे प्रयत्न केले. यातील अनेक कुटुंबामध्ये ताणतणाव कमी करण्यात यश मिळाले असून काही प्रकरणात भविष्यातील समस्या टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान समुपदेशनानंतरही समाधान न झालेल्या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणात आठ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शारीरिक अत्याचार, सातत्याने होत असलेल्या छळाच्या घटनांमध्ये पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणावर पुढील तपास सुरू आहे. सकारात्मक बाब म्हणजे समुपदेशन व चर्चेच्या माध्यमातून 22 जोडप्यांनी समझोता करून पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र अनेकदा मोबाईलचा वापरही जोडप्यांमध्ये वादास कारणीभूत ठरत आहे. अतिरेक वापरासह सोशल मीडियावरील अनैतिक गोष्टींचाही त्यात भर पडत आहे एकूण नोंदवलेल्या अर्जापैकी 65 अर्जांची निर्मिती करण्यात आली असून चौकशी सोबतच समुपदेशन पूर्ण करून फाईल बंद करण्यात आली असे सेलच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.









