आदिवासी कुटुंबांना कुक्कुटपालन व्यवसायाची जोड शबरी महामंडळाच्या उपक्रमातून स्वावलंबनाची नवी संधी

18

आदिवासी कुटुंबांना कुक्कुटपालन व्यवसायाची जोड
शबरी महामंडळाच्या उपक्रमातून स्वावलंबनाची नवी संधी

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755

शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत “Household Level Poultry Units and Marketing Linkages” हा प्रकल्प नानिवली (ता. जि. पालघर) येथील जन्मभूमी कॉप शॉप सहकारी संस्था मर्या. यांना मंजूर करण्यात आला आहे.
या प्रकल्पाअंतर्गत १० आदिवासी कुटुंबांना घराजवळ कुक्कुटपालन सुरू करण्यासाठी प्रत्येकी एक पिंजरा व ३० अंडी देणारी कोंबडी पिले वाटप करण्यात आली. अशा प्रकारे एकूण १० पिंजरे व ३०० कोंबडी पिलांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश आदिवासी कुटुंबांना गावातच पूरक उद्योग उपलब्ध करून देणे, त्यांना स्वावलंबी करणे तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे हा आहे.
यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना पिंजरे वितरित करण्यात आले. या प्रसंगी शबरी महामंडळाचे व्यवस्थापक (कोकण विभाग) राजेश पवार, प्रादेशिक व्यवस्थापक (जव्हार) योगेश पाटील, सहकारी संस्थेचे अध्यक्ष निलेश सवरा, स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करताना कुक्कुटपालन व्यवसायातील संधी, बाजारपेठेतील मागणी आणि तांत्रिक बाबींची सविस्तर माहिती दिली.
या उपक्रमामुळे आदिवासी कुटुंबांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला होणार असून महिलांनाही रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्याबरोबरच प्रशिक्षित कामगारांची निर्मिती होणार आहे.
शबरी महामंडळाच्या या उपक्रमामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यांची मजबुती, आदिवासी भागातील उत्पादनवाढ आणि स्थानिक बाजारपेठेतील मागणी पूर्ण करण्यास हातभार लागेल, असे मान्यवरांनी व्यक्त केले.