तलासरीत सहा लाखांची ऑनलाइन फसवणूक!
सायबर गुन्हेगार सक्रिय – नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755
तलासरी :- तलासरी तालुक्यातील एका नागरिकाची तब्बल सहा लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सरकारी योजना आणि आरटीओ नोंदणीच्या नावाने पाठवलेल्या खोट्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ही फसवणूक घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीला मोबाईलवर एक लिंक आली. ही लिंक सरकारी योजनेशी संबंधित असल्याचे भासवत गुन्हेगारांनी त्यावर क्लिक करण्यास प्रवृत्त केले. लिंक उघडल्यानंतर OTP आणि बँक खात्याची माहिती मागवली गेली. ती माहिती मिळताच सायबर गुन्हेगारांनी खात्यातून तब्बल सहा लाख रुपये काढून घेतले.
या घटनेनंतर पीडित व्यक्तीने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून सायबर सेल या प्रकरणाचा तपास करत आहे. पालघर जिल्ह्यात अलिकडे अशा प्रकारच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
सावधानतेच्या सूचना :
खरी PM Kisan वेबसाईट आहे : https://pmkisan.gov.in
खरं RTO/परवाना पोर्टल आहे : https://parivahan.gov.in
कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
OTP, कार्ड डिटेल्स, UPI PIN कोणालाही देऊ नका.
मोबाईलवर आलेला सरकारी नावाचा मेसेज/कॉल देखील खात्री करूनच स्वीकारा.
ही घटना सर्वांसाठी एक इशारा असून, नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे.









