शिर्डीत १५१ संतांची शाही मिरवणूक संपन्न…
शिर्डी मध्ये शाही मिरवणूक भव्य उत्साह मध्ये पार पडली.
दैनिक मीडिया वार्ता. अहिल्यानगर:शिर्डी.
सुनील भालेराव.
9370127037
अहिल्या नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यामध्ये साई नगरी शिर्डीत १५१ संत-महंतांची भव्य अशी शाही मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.
साई मंदिरापासून निघालेल्या या मिरवणुकीने शिर्डीकरांचे लक्ष वेधून घेतले.
घोड्यावर स्वार झालेले आणि बग्गीतून प्रवास करणारे महंत, नाशिकसह विविध ठिकाणांहून आलेले संत आणि ढोल-ताशांचा गजर यामुळे जणू शिर्डीत कुंभमेळाच अवतरल्याचा भास अनेकांना झाला.
या मिरवणुकीत महंत विष्णूगिरी महाराज, काशीकानंद महाराज, सुधीरजी महाराज, माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते, माजी नगराध्यक्ष सुमित्र कोते, धनराज कोते, हरिश्चंद्र कोते यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. मिरवणुकीनंतर धार्मिक जयघोषात संतांचे संतपूजन आणि पंगत आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष कैलास कोते म्हणाले, “शिर्डी ही साईंची पवित्र भूमी आहे, जिथे त्यांनी जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश दिला. येथे आलेल्या संत-महंतांनी साईंचा हा संदेश देशभरात पोहोचवावा, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.”
महामंडलेश्वर काशीकानंद महाराज यांनी कोते परिवाराच्या योगदानाचे कौतुक केले.
ते म्हणाले, “कोते परिवाराने नेहमीच धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या पुढाकाराने झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये आतापर्यंत अडीच हजार जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. त्यांचे हात नेहमीच चांगले काम करत असतात, त्यामुळे भविष्यातही संत-महंत पूजन हा उपक्रम सुरूच ठेवावा. “या शाही मिरवणुकीत साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य आणि मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
🔹🔹🔹