Home latest News मुंबईत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

मुंबईत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

73

मुंबईत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

मुंबईत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन

पूनम पाटगावे
जोगेश्वरी मुंबई प्रतिनिधी
मो. नं. ८१४९७३४३८५

मुंबई :- राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे शनिवार दि.३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजलेपासून एलफिस्टन टेक्निकल हायस्कूल येथे करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्यामधील ७ हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागातर्फे आयोजित मेळाव्यास २००० पेक्षा अधिक उमेदवारांनी हजेरी लावली. सदर मेळाव्यामध्ये मुंबई शहरातील नामांकित कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेतल्या गेल्या. तसेच उद्योजकता मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मेळाव्याचे उदघाटन मंत्री श्री. लोढा, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. दीपक केसरकर, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन., मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थित करण्यात आले. राज्यात अशाप्रकारे ३०० मेळावे आयोजित करून ५ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे, असे मत श्री. मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
मेळाव्यामध्ये बी. व्ही. जी. इंडिया लि., आयसिजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवशक्ती, एम्पे्रिटिव्ह इत्यादी उद्योग सहभागी झाले. दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलीटेक्निक, इंजिनिअरिंग पदवी इ. पात्रताधारक उमेदवारांसाठी मेळाव्यात बँकिंग, आयटीआयएस, टुरिझम, हॉस्पिटिलिटी, एचार आप्रेन्टीशिप, डोमेस्टिक वर्कर, इलेक्ट्रॉनिक्स, मॅनेजमेंट तसेच मीडिया अँड एंटरटेनमेंट अशा विविध क्षेत्रातील एकूण ७ हजार पदे उपलब्ध आहेत.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थातून एक किंवा दोन वर्षाचा तांत्रिक अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराकरिता नामांकित कंपन्यामध्ये शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत अप्रेनटीसशिपची पदेही या मेळ्याव्यात उपलब्ध केली गेली.
मेळाव्यामध्ये स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांकरीता आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणारी विविध शासकीय महामंडळे सहभागी करण्यात आली असून यामध्ये आण्णासाहेब पाटील आर्थिक मागासवर्ग विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ यांच्या योजनाची माहिती पुरवणारे स्टॉल्स लावण्यात आले. याद्वारे विविध योजनांची माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. याचबरोबर विविध शासकीय व खासगी क्षेत्रातील बँकाचाही समावेश करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण योजनाचीही माहिती उमेदवारांना देण्यात आली.