बुलढाणा: मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथील भूमिपुत्र, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार प्रा. गजेंद्र गवई यांना गेल्या ३५ वर्षांपासून विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टोलोसा, मेक्सिको यांच्या वतीने “डॉक्टरेट ऑफ सोशल वर्क” ही मानद डॉक्टरेट पदवी तसेच डॉ. बी. आर. आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड–२०२६ प्रदान करण्यात आला.
या सन्मानानिमित्त सार्वजनिक भीमजयंती उत्सव समितीच्या पुढाकाराने मेहकर नगर परिषद स्वतंत्र मैदान येथे आयोजित साजन–विशाल व्हीआयपी प्रबोधन कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते प्रा. गजेंद्र गवई यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्यामबाबू उमाळकर यांनी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकर नगर परिषदेचे अध्यक्ष किशोरभाऊ गारोळे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सिद्धार्थ खरात उपस्थित होते.
यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते प्रा. गजेंद्र गवई यांना शाल, फेटा, बुके तसेच मानद डॉक्टरेट पदवी आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी प्रा. गवई यांच्या विविध सामाजिक कार्याचा गौरव करून त्यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी ज्येष्ठ नेते ॲड. अनंतराव वानखेडे, नगरसेवक सतीश ताजने, उत्सव समिती अध्यक्ष सोपानराव देबाजे, भाई कैलास सुखधाने, समितीचे पदाधिकारी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाई कैलास सुखधाने यांनी केले, तर आभार प्रदर्शन सरपंच गजानन जाधव यांनी मानले.
मेहकर–लोणार मतदारसंघातील अनेक गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.









