चंद्रपूर:भिलाई स्टील प्लांटचे प्रभारी संचालक चित्त रंजन मोहापात्र यांनी रविवार, ७ जून रोजी चंद्रपूर फेरो अलॉय प्लांटला भेट दिली. प्लांटमध्ये आगमन झाल्यावर कार्यकारी संचालक पी. मुरुगेशन यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
या भेटीदरम्यान प्लांटची सद्यस्थिती, भावी योजना आणि नफाक्षमता वाढवण्याबाबत एक सविस्तर सादरीकरण करण्यात आले. कार्यकारी संचालक पी. मुरुगेशन यांनी सांगितले की, आर्थिक कामगिरी मजबूत करण्यासाठी प्लांटमध्ये खर्च-कपात आणि कार्यक्षमता सुधारण्यावर भर दिला जात आहे.
मोहापात्र यांनी फेरो अलॉय विभागातील SAF-3 आणि पॉवर प्लांटला भेट देऊन अधिकारी व तंत्रज्ञांशी संवाद साधला आणि विकासासाठी सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘सेल’च्या पर्यावरण बांधिलकीअंतर्गत प्लांट परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
या दौऱ्यात भिलाई येथील वरिष्ठ व्यवस्थापक राजीव जाजू आणि सहाय्यक व्यवस्थापक विवेक चौहान उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी समन्वयन मानव संसाधन विभागाने केले.









