लुजैन अल हाथलुल सामाजिक कार्यकर्ती,जी स्त्रियांच्या अधिकारांसाठी लढते पण आता लढू शकणार नाही.

फोटो मधील मुलीचं नाव आहे लुजैन अल हाथलुल. वय 31, सौदी अरेबियातील सामाजिक कार्यकर्ती आहे जी स्त्रियांच्या अधिकारांसाठी लढते पण आता लढू शकणार नाही, कारण तिला तब्बल 6 वर्षांची शिक्षा झाली आहे.

भारतात एखादी चुकीची गोष्ट घडते तेव्हा आपण राज्यकर्त्यांना, नागरिकांना आणि शेवटी संविधानाला दोष देऊन मोकळे होतो, पण आपण स्वतः ती चुकीची गोष्ट दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करतो का? पुढाकार घेतो का? तर नाही.

लुजैन या मुलीचा गुन्हा इतकाच आहे ती पुरुषी पालकत्व नाकारते, म्हणजे एकटी स्त्री घराबाहेर पडू शकत नाही, ती बँकेत जाऊ शकत नाही, ती खरेदीला जाऊ शकत नाही, अगदी पासपोर्ट काढण्या पासून लग्न करण्यापासून ते घटस्फोट घेण्यापर्यंत सर्व अधिकार तिच्या घरातील पुरुषाला आहेत,त्यांनी परवानगी दिली तरच ह्या गोष्टी ती करू शकते. ह्याच ‘पुरुषी पालकत्व कायद्याला’ ती विरोध करत आहे ते पण आजच्या काळात..

भारतीय सनातनी संस्कृतीत स्त्रीला जसं बाप, भाऊ, पती, मुलगा याच्या वरदहस्ताखालीच राहावे लागायचे तसाच अगदी सेम हा ‘पालकत्व कायदा’ आहे बरं..

बरं तिने 2018 मध्ये दुसरा पण गुन्हा केलाय तो म्हणजे “स्त्री असून गाडी चालवण्याचा गुन्हा” म्हणजे तिकडे स्त्री गाडी सुदधा चालवू शकत नव्हती. तिच्यावर राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा ठपका ठेऊन तिला तुरुंगात डांबलं गेलंय.

भारतासारख्या देशात आता चूल आणि मूल दूर सारून चार भिंतीच्या बाहेर निघून स्त्रीचं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं आहे. 26 जानेवारी 1950 ला भारतात संविधान लागू झालं आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला. 1951 च्या पहिल्याच निवडणुकीला भारतीय स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला तो ही अगदी फुकट. त्यासाठी त्यांना कुठलेही आंदोलन, मोर्चा किंवा कठोर परिश्रम करावे लागले नाहीत. तोच मतदानाचा अधिकार सौदी अरेबियातील स्त्रियांना 2015 मध्ये मिळतो. म्हणजे आपल्या नंतर तब्बल 65 वर्षांनी..बघा विचार करा.

आजही भारतीय स्त्री उघडपणे संविधान काय आहे त्याने आपल्या आयुष्यात काय आमूलाग्र बदल घडवला आहे याबद्दल अनभिज्ञ आहेत, ते संविधान समजून घ्यायचा वाचून घ्यायचा प्रयत्न तर करत नाहीतच पण काही स्त्रिया संधी मिळेल तिथे त्याच संविधानाची अवहेलना करण्यात मात्र पुढे असतात. केवळ स्त्रियांचे स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता,लोकशाही, स्त्रियांचे मानवी हक्क मागितले म्हणून लुजैन नावाच्या ह्या तरुणीला तुरुंगात डांबले जात असेल तर संविधानामुळे सर्व स्वातंत्र्य फुकट उपभोगणाऱ्या भारतीय स्त्रियांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही घटना म्हणता येईल..

बाकी उठता बसता “थँक यु बाबासाहेब थँक यु बाबासाहेब” म्हंटल तरी ते कमीच आहे. इतके अनंत उपकार आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या देशावर आणि विशेषतः स्त्रियांवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here