मुंबई-हल्ली नागरिक मॉल-मार्टमधून फळे-भाज्या घेण्याबरोबरच विविध प्रकारचे फ्रोझन फूडही खरेदी करतात. त्यात फ्रोझन मांस-मच्छीही असतात. पण त्यांची एक्स्पायरी डेट योग्य असते का? याचबरोबर मुंबईत चिकन पुरवणाऱ्या पोल्ट्रीफार्ममध्ये कोंबड्यांचे योग्यप्रकारे लसीकरण होते की नाही, याची नियमित तपासणी होते का, अशी प्रश्नांची सरबत्ती करत एकप्रकारे मुंबईकरांच्या ताटातील चिकन सुरक्षित आहे का, असा खडा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी केला. तसेच या प्रश्नावर व्यापक जनजागृती करण्याचे निर्देशही सरकारला दिले.
कीटकनाशकाच्या फवारणीमुळे गेल्या वर्षी यवतमाळमधील २० शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले होते. त्यातच दुधासह अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या प्रश्नावर ‘सिटिझन सर्कल फॉर सोशल वेल्फेअर अँड एज्युकेशन’ या संस्थेने अॅड. शेहजाद नक्वी यांच्यामार्फत जनहित याचिका केली आहे. याविषयी न्या. नरेश पाटील व न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर पुढची सुनावणी झाली.
सध्याच्या मॉल संस्कृतीत नागरिक मॉलमधून चकाकती फळे, भाज्या व इतर खाद्यपदार्थ विकत घेणे पसंत करतात. मात्र, अशा खाद्यपदार्थांची तपासणी होते का? मॉलमध्ये फ्रिझर असतात आणि त्यात फ्रोझन मांसमच्छीही असते. त्यांची ‘एक्स्पायरी डेट’ योग्य आहे की नाही हे तपासले जाते का? फ्रिझरमधील ‘जंकफूड’ हे लहान मुलांच्या खाण्यासाठी योग्य आहे की नाही, याची तपासणी होते का? असे अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न खंडपीठाने न्यायालयात उपस्थित असलेले अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व सरकारी वकिलांना विचारले. मात्र त्याविषयी त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. तेव्हा, मॉलमधील खाद्यपदार्थ आणि विशेषत: फ्रोझन मांस-मच्छीच्या कालबाह्यतेविषयी तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत खंडपीठाने व्यक्त केले. तसेच या प्रश्नावर नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हायला हवी, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागामार्फत सार्वजिक ठिकाणे, सिनेमागृहे, मॉल-मार्ट इत्यादी ठिकाणी जाहिराती लावण्याबाबत विचार करण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. तसेच यासंदर्भात सरकारने सहा आठवड्यांत प्रतिज्ञापत्रावर सविस्तर उत्तर दाखल करावे, असे निर्देशही खंडपीठाने दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here