वडीलासोबत खेळता खेळता दोन महिन्याच्या चिमुकलीने सोडला प्राण

वडीलासोबत खेळता खेळता दोन महिन्याच्या चिमुकलीने सोडला प्राण

✍️लुकेश कुकडकर✍️
गडचिरोली तालुका प्रतिनिधी
मो 8999904994

गडचिरोली : देसाईगंज तालुका मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढाळा गावात आज, सोमवार १० मार्चला सकाळच्या सुमारास हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका दोन महिन्याच्या चिमुकलीने वडीलासोबत खेळता खेळता अचानकपणे प्राण सोडल्याने कुटुंबियांवर मोठा आघात झाला. सान्वी उमेश राऊत वय २ महिने रा. कोंढाळा, ता. देसाईगंज जि.गडचिरोली असे मृत चिमुकलीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, नेहमीप्रमाणे चिमुकलीच्या आईने आज सोमवारी सकाळी ७.१५ वाजेच्या दरम्यान बाळाला दूध पाजले. दूध पाजल्यानंतर काही वेळाने बाळाचे वडील उमेश राऊत वय २५ वर्षे हे चिमुकली सोबत खेळू लागले.
अचानक खेळता खेळता सकाळी ७.३० च्या सुमारास चिमुकलीच्या नाकावाटे व तोंडातूनदूध बाहेर निघू लागले. तितक्यातच जवळच असलेल्या आईने चिमुकल्या बाळाकडे धाव घेतली. तोपर्यंत चिमुकल्या बाळाची प्राणज्योत मावळली. आई-वडिलांनी चिमुकलीला बराच वेळ आवाज देऊनही बाळाने कुठलीही हालचाल न केल्याने कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.