पोलादपूर एसटी स्थानकामध्ये वृध्देच्या हातातील बांगडयांची चोरी
दोन तोळे सोन्याचा ऐवज सराईतपणे चोरला
✒संदिप जाबडे✒
मीडिया वार्ता न्यूज
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
८१४९०४२२६७\९६६५०३५९५
पोलादपूर (रायगड) – काटेतळी येथून पोलादपूर एस.टी.स्थानकामध्ये चरई गावात जाण्यासाठी पोलादपूर बोरावळे एस.टी.बसमध्ये बसण्यासाठी गाडीत चढणाऱ्या वृध्द महिलेच्या उजव्या हातातील प्रत्येकी एक तोळा सोन्याच्या दोन बांगडया सराईत चोरटयांनी कापून नेल्याची घटना मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. यापूर्वी पोलादपूर एस.टी.स्थानकातून एका आदिवासी महिलेचे बाळ चोरीला गेले होते.
पोलादपूर तालुक्यातील चरई हनुमानवाडीतील वृध्द महिला सुनंदा दिनकर सकपाळ ही काटेतळीला गांवदेवीच्या पूजेला आली असता तेथे मुक्काम करून त्यांच्या चुलत बहिण वनिता रामदास सकपाळ हिच्यासोबत सकाळी चरई येथे जाण्यासाठी पोलादपूर एस.टी.स्थानकामध्ये आल्या. यावेळी पोलादपूर बोरावळे गाडीची वाट बघत थांबल्या. तेथे बोरावळेला जाणारी एस.टी.बस साधारणत: 9 वाजता आली असता दोघी गाडीमध्ये बसण्यासाठी चढत असताना तीन व्यक्ती दरवाजातच उभ्या होत्या. त्यामुळे त्यांचा गाडीच चढण्यात अडथळा होऊन वनिता सकपाळ हिने तुम्ही गुंड आहात काय, गाडीत चढायचे नसेल तर आम्हाला अडचण का करता, असे सुनावले तर त्यांनी कंडक्टर नसल्याने आम्ही उतरत आहोत असे सांगून तिघेही मराठी भाषेतच उत्तर देत गाडीतून उतरले. दोघीही गाडीमध्ये बसल्या. त्यावेळी सुनंदा सकपाळ यांना त्यांच्या उजव्या हातातील दोन सोन्याच्या बांगडया नसल्याचे लक्षात आले. यावेळी गोऱ्या रंगाचा उंचपुरा व काळे हाफ टिशर्ट आणि हाफ पँट घातलेला दाढी वाढलेल्या इसमासह अन्य दोन व्यक्तींचा या चोरीत सहभाग असल्याचा संशय यावेळी वृध्द महिलेने व्यक्त केला आहे.
पोलादपूर एस.टी.स्थानकामध्ये सीसीटिव्ही कॅमेरे नसल्याने चोरी करणाऱ्या व्यक्तींबाबत तपास लावण्याचे आव्हान पोलादपूर पोलीसांसमोर जड जात असून या चोरीवेळी पोलीसांनी तातडीने पोलादपूर शहरामध्ये विविध दुकानांमध्ये चौकशी करून चोरटे शहरामध्ये आले अथवा परस्पर महामार्गावरून फरार झाले याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, वृध्द महिलेने तिचा मुलगा शंकर सकपाळ याच्यासोबत चर्चा करून पोलादपूर पोलीसांकडे या चोरीची रितसर फिर्याद दिली.