बल्‍लारपूर शहर व तालुक्‍यासाठी पाच वर्षाचा आरोग्‍य विषयक आराखडा तयार करावा: आ. सुधीर मुनगंटीवार

53

बल्‍लारपूर शहर व तालुक्‍यासाठी पाच वर्षाचा आरोग्‍य विषयक आराखडा तयार करावा: आ. सुधीर मुनगंटीवार

ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

ग्रामीण भागात जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांची दुरूस्‍ती करून विलगीकरणासाठी वापर करावा: आ. सुधीर मुनगंटीवार
बल्‍लारपूर शहर व तालुक्‍यासाठी पाच वर्षाचा आरोग्‍य विषयक आराखडा तयार करावा: आ. सुधीर मुनगंटीवार

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
बल्लारपूर : कोरोनाचे संकट येत्‍या वर्षभरात संपेल किंवा नाही याबाबत कोणीही भाष्‍य करू शकत नाही, त्‍यामुळे या संदर्भात दिर्घकालीन उपाययोजना करण्‍याची आवश्‍यकता आहे. बल्‍लारपूर येथे हवेतून ऑक्‍सीजन घेणारा प्‍लॅन्‍ट तयार करण्‍याबाबत मी जिल्‍हाधिका-यांशी चर्चा केली आहे व त्‍यांनी याला मान्‍यता देखील दिलेली आहे. तिस-या लाटेची शक्‍यता लक्षात घेता सन्मित्र सैनिकी शाळा, सुभाष टॉकीज, बीआयटी कॉलेज, येनबोडी येथील शाळा येथे ७५० बेड्स तयार होवू शकतात. त्‍याचप्रमाणे जुन्‍या क्रिडा संकुलात सुध्‍दा कायमस्‍वरूपी हॉस्‍पीटल उभारले जावू शकते. यादृष्‍टीने बल्‍लारपूर शहर व तालुक्‍यासाठी पुढील पाच वर्षासाठी आरोग्‍य विषयक आराखडा तयार करण्‍याचे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

दिनांक ११ मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्‍लारपूर शहर व तालुक्‍यातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. या ऑनलाईन बैठकीत बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, मुख्‍याधिकारी विजय सरनाईक, तहसिलदार संजय राईंचवार, उपविभागीय अधिकारी, ग्रामीण रूग्‍णालयाचे वैद्यकिय अधिक्षक, तालुका वैद्यकिय अधिकारी, काशी सिंह, निलेश खरबडे, मनीष पांडे, समीर केने आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेतला. प्रामुख्‍याने विसापूर नजिकच्‍या क्रिडा संकुलात तयार करण्‍यात येत असलेल्‍या १०० बेडेड डीसीएचसी रूग्‍णालयात ७० साधे बेड्स व ३० ऑक्‍सीजन बेड्स उपलब्‍ध होतील यादृष्‍टीने जलदगतीने कार्यवाही करण्‍याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. केंद्र सरकारच्‍या कामगार विभागाच्‍या माध्‍यमातुन कामगार रूग्‍णालय उभारण्‍यासाठी आपण प्रयत्‍न करणार असल्‍याचे ते यावेळी म्‍हणाले. विसापूर येथे जे वसतीगृह आहे त्‍या वसतीगृहाचे रूपांतर रूग्‍णालयात करून त्‍या ठिकाणी १०० ते १५० आयसीयू बेड्स तयार होवू शकतात. हे रूग्‍णालय कायमस्‍वरूपी होवू शकेल यादृष्‍टीने प्रस्‍ताव तयार करावा असे निर्देशही त्‍यांनी दिले. बामणी, विसापूर, कोठारी येथे खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन मोठे सभागृह बांधण्‍यात येईल. ज्‍या माध्‍यमातुन विलगीकरण केंद्र तयार होवू शकतील असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

यावेळी मुख्‍याधिकारी विजय सरनाईक, तहसिलदार संजय राईंचवार आदींनी कोरोना विषयक उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीला न.प. उपाध्‍यक्षा सौ. मिना चौधरी, नगरसेवक अरूण वाघमारे, सौ. साखरा बेगम नबी अहमद, येलय्या दासरप, सौ. सारिका कनकम, महेंद्र ढोके, जयश्री मोहुर्ले, स्‍वामी रायबरम, पुनम निरांजने, सुवर्णा भटारकर, आशा संगीडवार, गणेश बहुरीया, राकेश यादव, सुमन सिंह आदींची उपस्थिती होती.