सण नव्हे इव्हेंट…

नुकताच झालेला दहीहंडीचा सण राज्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र उंचच उंच दहीहंडी फोडताना अनेक ठिकाणी दुर्घटना होऊन त्यात अनेक गोविंदा जखमी झाले. गुरुवार रात्री पर्यंत मुंबईतील जखमी झालेल्या गोविंदांची संख्या सव्वाशेच्या पुढे गेली. यातील काही गोविंदांना रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले तर काही गोविंदा अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत त्यातील काही गोविंदा जबर जखमी आहेत. अर्थात दहीहंडी फोडताना गोविंदा जबर जखमी होणे हे काही याच वर्षी घडले असे नाही दरवर्षी हेच चित्र पाहायला मिळते.

पूर्वी या उंचच दहीहंडी फक्त पुणे, मुंबई, ठाणे या मोठ्या शहरातच पाहायला मिळत असे मात्र अलीकडे हे लोण ग्रामीण भागातही पसरले आहे. ग्रामीण भागातही राजकीय नेते उंचच उंच दहीहंडी लावून हजारो रुपयांचे बक्षिसाचे आमिष दाखवून दहीहंडीचा इव्हेंट करुन राजकीय शक्तीप्रदर्शन करतात मात्र या शक्तीप्रदर्शनात अनेक गोविंदा जायबंदी होतात. राजकीय नेते गोविंदांचा विमा वगैरे शब्द वापरून तरुण गोविंदाना झुलवण्याचा प्रयत्न करतात पण अपघात झाल्यानंतर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यावर मिळणारी विम्याची रक्कम म्हणजे आयुष्याचे सार नव्हे! ऐन तारुण्यात जर कायमस्वरूपी अपंगत्व आले तर त्या तरुण गोविंदाची आणि त्याच्या कुटुंबाची काय अवस्था होईल याची कल्पनाही करवत नाही. ऐन तारुण्यात वृद्ध आई वडिलांवर अवलंबून उर्वरित जीवन कंठण्याची वेळ त्यांच्यावर येते. अशा कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या तरुण गोविंदांना राजकीय नेते वाऱ्यावर सोडतात कारण त्यांचे शक्तिप्रदर्शन संपलेले असते.

अमेझॉनवर खास ऑफर, मीडिया वार्ताच्या वाचकांसाठी
स्मार्टफोन, टीव्ही, घरगुती उपकरणे यांवर तब्बल ५०% सूट. लाभ घेण्यासाठी खालील बॅनरवर क्लिक करा.

अर्थात हे शक्तिप्रदर्शन केवळ दहीहंडी पुरतेच मर्यादित असते असे नाही तर तर सर्व सणांमध्ये असते. वास्तविक सण उत्सव हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. जगात सर्वाधिक सण भारतात साजरे केले जातात मुळातच भारत उत्सवप्रिय देश आहे मात्र अलीकडे हे सण उत्सवातील पावित्र्य नष्ट होत चालले आहे. ज्या उद्देशासाठी हे सण उत्सव साजरे केले जातात तो उद्देशच हरवला आहे आता हे सण उत्सव म्हणजे इव्हेंट बनले आहेत. कोणताही सण घ्या तो सण न राहता इव्हेंट बनला आहे मग तो दिवाळी असो की गणेशोत्सव. दिवाळीमध्येही फटाक्यांचे प्रदूषण आणि आगीच्या घटना घडतातच दिवाळी हा दिव्यांच्या सण आहे मात्र अलीकडे तो फटाक्यांच्या सण बनला आहे त्यामुळे ध्वनीप्रदूषणासोबतच वायू प्रदूषणही होते मात्र मोठ्या आवाजाचे प्रदूषण करणारे फटाके उडवून दिवाळी साजरी करण्याकडेच अनेकांचा कल असतो.

मागील काही वर्षात गणेशोत्सवाचे पावित्र्यही लोप पावले आहे. लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो उद्देशच आपण विसरलो आहोत. गणेशोत्सवातील उंचच उंच मूर्तींची स्पर्धा, नवसाला पावणाऱ्या गणेश मंडळातील स्पर्धा यामुळे गणेशोत्सव सण आहे की स्पर्धा असा प्रश्न पडतो. गणेशोत्सव म्हणजे राजकीय नेत्यांना पक्षांना आपले शक्तिप्रदर्शन करण्याचे हक्काचे व्यासपीठ वाटते. गणेश ही बुद्धीची देवता मानली जात असताना बुद्धी गुंडाळून त्याची खरी आराधना भक्ती करताच येत नाही. नवरात्रीमध्येही हीच परिस्थिती असते एकूणच आज सणांचे स्वरूप पूर्ण पालटले आहे. त्यातील पावित्र्य नष्ट झाले असून आता सण उत्सव म्हणजे केवळ इव्हेंट बनले आहे. सण उत्सव म्हणजे राजकीय नेत्यांसाठी शक्तीप्रदर्शन करण्याचे व्यासपीठ बनले आहे.

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

मो: ९९२२५४६२९५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here