“ब्रेक द चेन” अंतर्गत निर्बंधास 1 जून पर्यंत मुदतवाढ; चंद्रपूर जिल्ह्यात नवीन नियमावली जाहीर.

✒मनोज खोब्रागडे✒
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर, दि. 14 मे:- कोरोना विषाणूचा वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनेनुसार ” ब्रेक द चेन” अंतर्गत जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध व आदेशास जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि.15 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते दि. 1 जून 2021 रोजीचे सकाळी 7 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
“ब्रेक द चेन” अंतर्गत नवीन नियमावली :
इतर राज्यातून कोणत्याही प्रवासी साधनांद्वारे प्रवास करून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना 48 तास पूर्वीचा निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक असेल.
महाराष्ट्र शासनाकडील दि.18 एप्रिल 2021 व दि.1 मे 2021 च्या आदेशान्वये घोषित केलेल्या “सेन्सेटिव्ह ओरिजिन” या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांकरिता असलेली मानक कार्यप्रणाली, देशातील कोणत्याही भागातून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींकरिता लागू राहतील.
मालवाहतूक करणाऱ्या वाहनात केवळ 2 व्यक्ती ( वाहन चालक व क्लिनर) यांनाच प्रवासास मुभा असेल. जर सदर मालवाहतूक ही राज्याबाहेरून येणार असेल तर त्यातील वाहन चालक व क्लिनर यांनी चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी 48 तास पूर्वीचा निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक असेल व सदर निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल 7 दिवसांकरिता वैध असतील.
दूध संकलन, दुधाची वाहतूक व प्रक्रिया यास परवानगी असेल तथापि त्यांच्या किरकोळ विक्रीस अत्यावश्यक वस्तूंच्या आस्थापनेस व घरपोच वितरणास असलेले निर्बंध लागू राहतील.
सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी उपरोक्त आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.