ऐरोलीत नॉव्हेल्टीला आग; मायलेकीचा मृत्यू

55

नवी मुंबई: ऐरोलीमधील एका नॉव्हेल्टी दुकानाला लागलेल्या भीषण आगीत मायलेकींचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेमुळे सदर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आज पहाटे ३ वाजता ऐरोली सेक्टर-३ मध्ये ही घटना घडली. या दोघी मायलेकी दुकानावरील मजल्यावर राहत होत्या. रात्री उशिरा दुकान बंद केल्यानंतर दोघी वरच्या खोलीत जाऊन झोपी गेल्या. मात्र मध्यरात्री अचानक दुकानाने पेट घेतल्याने संपूर्ण घरात धूर झाला. घरातील लाइट बंद असल्याने आणि धुराचे लोळ घरभर पसरल्याने त्यांना काहीच दिसत नव्हते. त्यामुळे त्यांना घरातून बाहेर पडणे कठीण झाले आणि त्यातच त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. दुकानातून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग असल्यानं या मायलेकींना घरातून बाहेर पडता आलं नाही. मात्र घरातील दोन ते तीन पुरुषांनी खिडकीतून उडी मारून स्वत:चा जीव वाचवला. तर आगीतून वाचवण्यासाठी एक वर्षाच्या मुलाला खिडकीतून खाली फेकण्यात आलं, खिडकी खाली उभ्या असलेल्यांनी या मुलाला झेलल्याने त्याचे प्राण वाचले. या आगीत दुकानाचे प्रचंड नुकसान झालं आहे. आगीचं नेमकं कारण कळू शकलं नाही. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून अधिक तपास सुरू आहे.