लालपेठवासियांना आज परत जाणवले भुकंपसदृश धक्के

🖋 अश्विन गोडबोले
चंद्रपूर महानगर प्रतिनिधी
8830857351
चंद्रपूर : 16 जानेवारी
आज परत एकदा सायंकाळी 5 वाजून 9 मिनिटांनी काल रात्री बाबुपेठ परिसरात जाणवलेल्या भूकंपाच्या झटक्याप्रमाणे कंपन झाले असून लालपेठ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात काही सेकंद भूकंप सदृश्य हादरे जाणवले असून नागरिक या घटनेमुळे पुन्हा दहशती मध्ये आले आहे.
कालच्या घटनेची दखल घेत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी भूकंप सदृश्य घटनेची वस्तुस्थिती तपासून अहवाल मागवत,नेमकं काय घडलं? याबाबत चौकशीचे निर्देश दिले आहे.
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसराला 15 जानेवारी रोजी जाणवलेल्या भूकंपसदृश्य वस्तुस्थिती तपासण्याचे निर्देश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले .
बाबूपेठ भागात काल 15 जानेवारी रोजी रात्री 9:30 वाजता भूकंपासारखे धक्के जाणवले होते. यासंदर्भात काही नागरिकांनी पालकमंत्री मुनगंटीवार यांना अवगत केले. प्रसार माध्यमांमध्येही यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना कोणतीही भीती न बाळगण्याचे आवाहन करीत मुनगंटीवार यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशी करून वस्तुस्थितीजन्य अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. या घटनेत त्या परिसरात काही नुकसान झाले असल्यास त्याची माहिती देखील कळवावी व योग्य ती उपाय योजना करण्याच्या सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या.
याबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी सम्पर्क साधला असता भूगर्भात काही घडलं असेल अशी शक्यता वर्तविली मात्र जोपर्यंत चौकशीचा अहवाल प्राप्त होणार नाही तोपर्यंत नेमकं काय घडलं हे सांगता येणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. चंद्रपूरच्या भूगर्भात नेमकं काय घडलं? हे चौकशीनंतर नागरिकांच्या पुढे येणारच, पण सतत 2 दिवस घडलेल्या या घटनेमुळे नागरिक दहशतीमध्ये आलेले आहे. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ पासून शहरातील गांधी चौक ते बालाजी वॉर्ड परिसरामध्ये रात्रीच्या नऊ वाजून तीस मिनिटांनी अचानक धक्के जाणवू लागल्याने धरणीकंप झाल्याची शक्यता व्यक्त केल्या जात असुन काही लोकांच्या मते वेकोलिच्या खाणींमध्ये सुरुंग स्फोट केल्यामुळे परिसरात भूकंप सदृश्य धक्का जाणवल्याचे बोलल्या जात आहे.
जाणवलेले धक्के वेकोलीतील सुरुंग स्फोटामुळे बसल्याची शक्यता लक्षात घेता वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही लोकांनी संपर्क साधला असता त्यांनी खाणीत इतक्या रात्री सुरुंग स्फोट केल्याची शक्यता फेटाळून लावली. तरीही भुगर्भ शास्त्रज्ञ ह्या संदर्भात जोपर्यंत स्पष्टपणे आपला अहवाल देत नाही तोपर्यंत हादरे बसण्याचे निश्चित कारण कळू शकणार नाही. मात्र भुकंपसारखे हादरे अनुभवल्यामुळे चंद्रपूर शहरातील इतर भागातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यासंदर्भात प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ तथा भूगर्भ अभ्यासक सुरेश चोपणे ह्यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की चंद्रपूर शहराच्या चारही बाजूंनी कोळसा खाणी आहेत. ह्या खाणींमध्ये सुरुंग स्फोट केल्या जातात. काही भूमिगत खाणी बंद करण्यात आल्या असल्या तरीही त्या योग्य पद्धतीने बुजविण्यात आल्या नसुन तिथे पोकळी आहे. भूगर्भातील हालचालींमुळे ह्या बंद खाणीतील मोठा भाग आतल्याआत कोसळला असण्याची शक्यता असुन त्यामुळे हादरे बसले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही महिन्यांपूर्वी घुग्गुस येथे अश्याच सौम्य झटक्यानंतर जमीन खचून घरे जमिनीत धसल्याची घटना घडली होती. आजूबाजूला कोळसा खाणीतील उत्खनन सुरूच असल्याने चंद्रपूरातील काही भागात जाणवलेल्या कंपणांमुळे चंद्रपूर शहर आतुन पूर्णपणे पोखरल्या गेल्याचे स्पष्ट होत असुन चंद्रपूर शहर धोकादायक स्थितीत असल्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.








