डहाणू तालुक्यातील 600 शेतकऱ्यांना 30 हजार फळझाडांचे मोफत वाटप

17

डहाणू तालुक्यातील 600 शेतकऱ्यांना 30 हजार फळझाडांचे मोफत वाटप

आर्थिक स्वावलंबनाची नवी वाट

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755

डहाणू :- डहाणू तालुका हा निसर्गसंपन्न, शेतीप्रधान व आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकरी पारंपरिक शेतीसोबतच फळबाग लागवडीकडे वळल्यास आर्थिक स्वावलंबनाची नवी दारे खुली होऊ शकतात. याच उद्देशाने दिगंत स्वराज फाउंडेशन, मोखाडा आणि ऑल कार्ग्रो, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने डहाणू तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींतील 30 गाव व पाड्यांतील तब्बल 600 शेतकऱ्यांना 30 हजार फळझाडांचे मोफत वाटप करण्यात आले.या उपक्रमामध्ये धरमपूर, सायवन, आष्टे, धामणी, चळणी, दिवशी, दाभाडी या ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्याला 50 फळझाडे देण्यात आली. काजू, आंबा, पेरू, फणस, लिंबू, सिताफळ आणि साग यांसारख्या विविध फळझाडांचा यात समावेश होता. ही झाडे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लागवड झाल्यानंतर भविष्यातील उत्पन्नाचा नवा मार्ग खुला होणार आहे.फळझाडांची लागवड ही केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकणारी ठरणार नाही, तर पर्यावरण संवर्धनासाठीही महत्त्वाची ठरणार आहे. वाढत्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड ही काळाची गरज आहे. अशा वेळी या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण होऊन हिरवळ वाढण्यास हातभार लागणार आहे.या उपक्रमात दिगंत स्वराज फाउंडेशन चे संचालक राहुल तिवरेकर व CEO श्रद्धा शृंगारपुरे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक कमळाकर बुरंगे, एकनाथ निखडे व त्यांची संपूर्ण टीम यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांपर्यंत हा उपक्रम पोहोचवला. स्थानिक स्तरावर ग्रामपंचायतींनीही या उपक्रमात सहकार्य केले.शेतकऱ्यांच्या हातात 50 फळझाडे दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे व आनंदाचे भाव दिसून आले. या झाडांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांची आर्थिक परिस्थिती उंचावेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शासन व स्वयंसेवी संस्था सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र अशा प्रकारचे उपक्रम समाजातील प्रत्येक शेतकऱ्याला थेट फायदा पोहोचवतात, ही या उपक्रमाची खरी ताकद असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.