शुक्रवारपासून पोलीस भरतीला सुरुवात; मुलांची तयारी अंतिम टप्प्यात

रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
9420325993
अलिबाग : – पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून 31 हजार 63 उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज दाखल केले आहेत. रायगड पोलीस दलातील 422 जागांसाठी ही भरती होणार असून शुक्रवारी उमेदवारांच्या शारीरिक चाचणीचे प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ऐन पावसाळ्यात ही भरती होणार असल्याने उमेदवारांसह पोलीस प्रशासनास ही प्रक्रिया सुरळीत पार पडताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
मागील वर्षी डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत 218 जागांसाठी भरती झाली होती. यंदा 422 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामध्ये 382 पोलीस शिपाई, नऊ बॅडसमन आणि 31 पोलीस चालक या पदांचा समावेश आहे. पोलीस शिपाई, बँडमेन व चालक या पदासाठी एकूण 31 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यात 26 हजार 69 पुरुष व 4994 महिला उमेदवारांचा समावेश आहे. भावी पोलिसांची मैदानी चाचणी येते 21 जून पासून घेण्यात येणार आहे. ही चाचणी नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुल व कुरूळ येथील आरसीएफ वसाहती मधील क्रीडा संकुलामध्ये घेतली जाणार आहे. सध्या पावसाचा हंगाम आहे. या पावसात ही प्रक्रिया योग्य पद्धतीने व्हावी यासाठी पोलीस दलाने नियोजन केले आहे. जास्त पाऊस असल्यास ही प्रक्रिया पुढे ढकलण्यात येणार आहे. पावसाने विश्रांती घेतल्यास मैदानांची पाहणी करून या प्रक्रियेला पुन्हा सुरुवात केली जाणार आहे. शुक्रवारी होणाऱ्या मैदानी चाचणीसाठी सुरुवातीचे आठ दिवस पाचशे उमेदवारांना बोलावले जाणार आहे. त्यानंतर हवामानातील बदलानुसार पुढे 800 उमेदवारांना चाचणीसाठी बोलावले जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.
एक महिना ही या चाचणीसाठी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
*आमिष देणाऱ्यांवर राहणार नजर*
पोलीस भरती प्रक्रिया निपक्षपातीपणे पार पडण्यासाठी अडीचशे हुन अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कालावधीत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही व्यक्तीकडून आमिष दाखवून पैशाची मागणी केल्यास उमेदवाराने थेट पोलीस अधीक्षक कार्यालय 02141-228473 व 8605494772 या क्रमांकावर संपर्क साधावा व तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.








