Home latest News ग्रामपंचायतच्या अधिकारांना जिल्हा परिषदेची वेसण? सरपंचांची नाराजी

ग्रामपंचायतच्या अधिकारांना जिल्हा परिषदेची वेसण? सरपंचांची नाराजी

121

ग्रामपंचायतच्या अधिकारांना जिल्हा परिषदेची वेसण?
सरपंचांची नाराजी

ग्रामपंचायतच्या अधिकारांना जिल्हा परिषदेची वेसण? सरपंचांची नाराजी

रत्नाकर पाटील
अलिबाग तालुका प्रतिनिधी
९४२०३२५९९३

अलिबाग -ग्रामपंचायत यांनी गावातील किंवा गावठाणा बाहेरील बांधकामास सिडको, जिल्हाधिकारी यांनी सांगितल्याशिवाय ना हरकत दाखला देऊ नये, असे फर्मान जिल्हा परिषदेने काढले आहे त्यामुळे जिल्ह्यातील सरपंच आणि सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.बांधकामे करताना संबंधित कुठलेही नियम पाळले जात नाहीत.त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये बकालीकरण होते,असे प्रशासनाने अधोरेखित केले आहे.
यासंदर्भातील पत्र जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार कुठल्याही बांधकामात ना हरकत दाखला देण्यास ग्रामपंचायतींना मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारे एखाद्या ग्रामपंचायतीने नाहरकत दाखला दिल्यास संबंधित ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे.त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत प्रशासन दिले आहेत.
या आदेशामुळे ग्रामपंचायत क्षेत्रात पूर्वीपासून असलेल्या जुन्या घरांना नव्याने बांधकाम करण्यास फारच अडचणीचे होणार आहे. मुळात छोटे क्षेत्र असल्याने बिनशेती करणे शक्य होणार नाही. त्यामुळे बांधकाम करता येणार नाही.बिनशेती दाखला किंवा बांधकामाची परवानगी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहेत. गेल्या दहा वर्षात यासाठी ग्रामपंचायतीकडे नाहरकत दाखला मागण्यात आला नाही. परस्पर दाखले देण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे .
ग्रामपंचायतीना ना हरकत दाखल देण्यावर निर्बंध घालण्यात आल्याने गावातील घरांची पुनर्बांधणी करता येणार नाही.बिनशेती परवानगी देताना पावसाळी पाणी जाण्याच्या मार्गाचे सर्वेक्षण करणे आवश्यक असते. परंतु तसे होत नाही. काही गावे ही खाडी किंवा समुद्रकिनारी आहेत.तेथे एकीकडे सीआरझेड दुसरीकडे ना हरकत दाखल्याची मनाई अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या ग्रामस्थांनी करायचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

जिल्हा प्रशासनाने बांधकामासाठी ना हरकत दाखला देण्याचे ग्रामपंचायतीचे अधिकार काढून घेतल्याने मोठ्या अडचणी येणार आहेत. गावात वर्षानुवर्षे राहणाऱ्या कुटुंबांना नवीन घर सहज बांधणे किंवा घराचे दुरुस्ती करणे शक्य होणार नाही. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करून या भूमिकेत योग्य फेरफार करून नागरिकांना दिलासा द्यावा.
मिलिंद कवळे
उपसरपंच वरसोली

गावठाण क्षेत्रातील 150 स्क्वेअर मीटर पर्यंत बांधकाम करण्याची परवानगी देण्याची अधिकार ग्रामपंचायत आहेत इतर ठिकाणी घर किंवा इमारत बांधायचे झाले तर त्याची परवानगी देण्याचे अधिकार शहर नियोजन प्राधिकरण म्हणजेच जिल्हाधिकारी सिडको,म्हाडा यांना आहेत. असे जरी असले तरी बांधकामाची परवानगी देताना या प्राधिकरणांना देखील संबंधित ग्रामपंचायतीकडून ना हरकत दाखला घेणे आवश्यक आहे. बांधकामे करताना प्राधिकरण आणि ग्रामपंचायत यांच्यात समन्वय यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत बास्टेवाड
मुख्य कार्यकारी अधिकारी
रायगड जिल्हा परिषद