वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील चार मजली अनधिकृत झोपड्यांवर कारवाई
अरुणकुमार करंदीकर
पनवेल : वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील स्थानकालगतच्या गरीब नगर येथील तीन – चार मजली झोपड्यांवर आज बुलडोझर फिरवून तोडक कारवाई करण्यात आली. रेल्वेच्या जागेवरील हे अतिक्रमण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हटविण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी एक हजार पेक्षा अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. आरपीएफ, जीआरपी आणि मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा रेल्वे स्थानक शेजारील झोपडपट्टी परिसरात सज्ज ठेवण्यात आला होता.
सदर कारवाई दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील दोन पुल बंद करण्यात आले होते. रेल्वेच्या जागेवर बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या झोपड्या हटविण्यासाठी सहा बुलडोझर आणण्यात आले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नविन रेल्वे मार्गाच्या विस्तारासाठी ही जमीन मोकळी करणे आवश्यक होते.
रेल्वेच्या विस्तारीकरण प्रकल्पासाठी अनधिकृत बांधकामांसह गरीब नगर झोपडपट्टीवर दिनांक १९ मे २०२६ पासून पाच दिवसांची मोठी तोडक कारवाई सुरु करण्यात आली आहे . मात्र आज झोपडपट्टी अतिक्रमण हटाव कारवाई दरम्यान झोपडी धारकांनी कारवाईला विरोध करण्यासाठी पोलिसांवर दगडफेक केली. तेव्हा जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून दगडफेक करणाऱ्या झोपडी धारकांना पकडून ताब्यात घेतले आहे. येथील जमिनीची जागा मोकळी झाल्यावर त्या ठिकाणी नवीन रेल्वे मार्ग टाकण्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
मुंबई सेंट्रल आणि दादर रेल्वे स्थानकांवरील लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वाढता ताण लक्षात घेता , पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनसच्या विस्तारासाठी पावले उचलली आहेत. वांद्रे टर्मिनसच्या सात नंबरच्या प्लॅटफॉर्मच्या पुढे विस्तार करणे आणि अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या हाताळणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. मुंबई महानगर क्षेत्रात मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावर सुमारे पन्नास अतिरिक्त लांब पल्ल्याच्या गाड्या सुरु करण्याचा रेल्वेचा मानस आहे. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता अधिक गाड्या चालवण्यासाठी पुरेशा प्लॅटफॉर्मची अत्यंत आवश्यकता आहे. ज्यामुळे मुंबईत अतिरिक्त टर्मिनल स्टेशनची गरज निर्माण झाली आहे.
या तोडक कारवाई नंतर जी जागा मोकळी होईल , तिचा वापर सर्वप्रथम वांद्रे टर्मिनस येथील डिझेल शेड हलविण्यासाठी केला जाणार आहे. डिझेल शेड स्थलांतरित झाल्यानंतर उपलब्ध झालेल्या अतिरिक्त जागेत रेल्वे टर्मिनसचा विस्तार केला जाणार आहे आणि तसेच सात नंबर प्लॅटफॉर्मच्या पुढे नविन प्लॅटफॉर्म निर्माण केले जाणार आहेत.









