साखरे गावात वनविभागाची धाड कोटींचा रक्तचंदन साठा जप्त
गुप्त माहितीवरून कारवाई २१२ रक्तचंदन ओंडक्यांची तस्करी उघडकीस
अरविंद बेंडगा
जिल्हा पालघर, पालघर
7798185755
पालघर तालुक्यातील साखरे गाव येथे डहाणू वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी धाड टाकत रक्तचंदन तस्करीचा भांडाफोड केला. ही कारवाई दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात आली. कारवाईत तब्बल २१२ रक्तचंदनाचे ओंडके जप्त करण्यात आले असून जप्त मालाची किंमत कोटी रुपयांमध्ये असल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.
ही यशस्वी कारवाई मुख्य वनसंरक्षक (CCF) एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक (DCF) निरंजन दिवाकर आणि वनविभागीय अधिकारी (DFO – दक्षता) रोशन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
मोहिमेत सहायक वनसंरक्षक रामानुज बांगड, वनपरिक्षेत्र अधिकारी हृषीकेश वाघमारे, सुशील नांदवटे, सौ. सरिता कराड तसेच अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
संबंधितांवर भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41(2)(b), 42(2) सह 69, 77 तसेच महाराष्ट्र वन नियमावलीतील नियम 31, 37, 53 सह 82 अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, रक्तचंदन तस्करीसंबंधी कोणतीही माहिती मिळाल्यास ती त्वरित जवळच्या वन विभाग कार्यालयाला कळवावी. माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल, असेही वनविभागाने स्पष्ट केले आहे.