Home latest News वनपट्ट्यासह शिधापत्रिकांचे वाटप – आदिवासींच्या संघर्षाला यश!

वनपट्ट्यासह शिधापत्रिकांचे वाटप – आदिवासींच्या संघर्षाला यश!

48

वनपट्ट्यासह शिधापत्रिकांचे वाटप – आदिवासींच्या संघर्षाला यश!

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755

डहाणू :- डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजाचा पिढ्यान्‌पिढ्या सुरू असलेला संघर्ष अखेर निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. दशकांपासून जंगलातील आपल्या हक्कासाठी लढा देणाऱ्या शेकडो कुटुंबांना शासनाने अखेर वनपट्टे, रेशनकार्डे आणि जातीची प्रमाणपत्रे वाटप केली आहेत. या ऐतिहासिक क्षणामुळे आदिवासी समाजाचा “हक्काचा हक्क” कागदावर ठसा उमटवून अधिकृत झाला असून शासनालाही झुकावे लागले आहे.
वनहक्क कायद्याअंतर्गत सादर केलेले दावे प्रशासनाने दीर्घकाळ प्रलंबित ठेवले होते. वारंवार टाळाटाळ करून या कायद्याला अधांतरी ठेवण्याचा प्रयत्न झाला. परंतु लाल बावटा पक्षाच्या सातत्यपूर्ण आंदोलनांनी हा डाव उधळून लावला. मोर्चे, धरणे, निवेदनांचा मारा, सळसळता संघर्ष आणि हजारो लोकांचा ठाम निर्धार यामुळे अखेर सत्तेला गुडघे टेकावे लागले. प्रशासन जितका वेळ दिरंगाई करत राहिले, तितका संघर्ष अधिक पेटत गेला आणि अखेरीस न्याय मिळवून देण्याची वेळ आली.
या ऐतिहासिक वाटपावेळी लाल बावटा पक्षाचे जिल्हा सहसचिव काॅ. शेरू वाघ, तालुका सहसचिव काॅ. सुभाष लहांगे, गावप्रमुख काॅ. रामजी बरड, रणकोळचे काॅ. रामु गोवारी, काॅ. मनोज सुतार, ऐना गाव प्रमुख काॅ. राजेश किंडरा आणि काॅ. वामन किंडरा यांसारखे नेते उपस्थित होते. याशिवाय शिवसेना उबाठा गटाचे नेते जयेंद्र दुबळा यांच्या उपस्थितीने या संघर्षातील एकतेची ताकद अधिक स्पष्ट झाली.
वनहक्काची कागदपत्रे आणि शिधापत्रिका हातात मिळताच आदिवासी समाजाने या क्षणाला उत्सवाचे स्वरूप दिले. ढोल-नगाऱ्यांचा गजर, महिलांच्या उभ्या ओव्या, युवकांचा जल्लोष आणि ग्रामदेवताप्रमाणे साजरा झालेला स्वागत सोहळा पाहून संपूर्ण डहाणू परिसर आनंदाने फुलून गेला. हे समाधान केवळ कागदावरच्या ठप्प्याचे नव्हते, तर पिढ्यान्‌पिढ्या अन्याय सहन करून उभ्या राहिलेल्या संघर्षाचा शंखनाद होता.
या प्रसंगी जिल्हा सहसचिव काॅ. शेरू वाघ यांनी भावनिक शब्दांत प्रतिक्रिया देताना सांगितले की, “ही फक्त भूमीच्या कागदपत्रांची वाटणी नाही, तर हा आदिवासींच्या हक्काचा पहिला औपचारिक विजय आहे. ही लढाई थांबणार नाही, अन्यायाच्या मुळावर वार करण्यासाठी ती आणखी जोमाने पेटणार आहे.”
डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजाच्या संघर्षाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. शासनाने दिलेल्या कागदपत्रांच्या माध्यमातून त्यांचा हक्क मान्य झाला असला तरी या संघर्षाने दाखवून दिले आहे की, नेतृत्व, एकता आणि सातत्यपूर्ण लढा यांच्यामुळे कोणताही अन्याय कितीही मोठा असला तरी पराभूत करता येतो.