माणगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने मारली बाजी, शिंदे गटाला मोठा धक्का?

सचिन पवार

रायगड ब्युरो चीफ

मो:8080092301

रायगड :-माणगाव तालुक्यातील अटीतटीच्या आणि चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले आहेत. तालुक्यात महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळाले असून 19 ग्रामपंचायत पैकी 15 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीने आपला झेंडा फडकविला असून चार ग्रामपंचायत शिंदे गटाकडे आल्या आहेत. खासदार सुनील तटकरे यांनी आपली राजकीय ताकद माणगाव तालुक्यात पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.

        राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शांततेने मतदान झाले होते. तालुक्यातील 19 ग्रामपंचायत पैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या होत्या तर उर्वरित 16 ग्रामपंचायतच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी शांततेत पार पडली. तालुक्यातील 19 ग्रामपंचायत पैकी पळसप, करंबेळी, टोळ खुर्द या तीन ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यापैकी पळसप आणि टोळ खुर्द या शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या तर करंबेळी ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे आली आहे. उर्वरित 16 ग्रामपंचायतच्या मतमोजणीत शिंदे गटाने कुंभे व मांगरूळ या फक्त दोन ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. तर 14 ग्रामपंचायत मध्ये महाविकास आघाडीने बाजी मारून प्रचंड यश प्राप्त केले आहे.

या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे आगामी रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिले गेले आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव, साई, मुठवली तर्फे तळे, होडगाव या राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जातात आणि या चार ग्रामपंचायतीच्या मतमोजणीकडे संपूर्ण माणगाव तालुक्याचे लक्ष लागले होते. या चारही ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीने आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे.

       माणगाव तालुक्यातील निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गट, बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, भाजप यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. संपूर्ण तालुक्यातील निवडणुका अत्यंत चुरशीच्या व अटीतटीच्या झाल्या होत्या. खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, बाबुशेठ खानविलकर, दीपक जाधव,अनिल नवगणे, प्रमोद घोसाळकर यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीवर आपले लक्ष केंद्रित केले होते. अखेर या संपूर्ण निवडणुकीत महाविकास आघाडीचाच करिष्मा दिसून आला व शिंदे गटाला जोरदार धक्का बसला. अवघ्या चार ग्रामपंचायतीवर शिंदे गटाला समाधान मानावे लागले. त्यामुळे आमदार भरतशेठ गोगावले यांना माणगाव तालुक्यात मोठा राजकीय धक्का बसला आहे.

ग्रामपंचायत आपल्याच ताब्यात राहावी यासाठी प्रत्येक राजकीय नेत्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. सरपंच पदाच्या उमेदवाराला आपल्याबरोबरच आपल्या पॅनल मधील इतर सदस्यांना देखील निवडून आणण्याची कसरत करावी लागली.

गोरेगावमध्ये विद्यमान सरपंच जुबेर अब्बाशी यांनी लागोपाठ दोन वेळा सरपंचपदी निवडून येण्याचा मान पटकावला आहे.

    निवडून आलेल्या ग्रामपंचायमध्ये भागाड महाविकास आघाडीचे सरपंच कौशल्या वाघमारे, साई राष्ट्रवादी सरपंच हवाबी समीर रहाटविलकर, चिंचवली महाविकास आघाडी सरपंच नंदू पारावे, न्हावे सरपंच महाविकास आघाडी तुकाराम शेपूंडे, मुठवली तर्फे तळे महाविकास आघाडी सरपंच वनिता जाधव, शिरवली तर्फे निजामपूर महाविकास सरपंच सदानंद पानसरे, डोंगरोली महाविकास आघाडी सरपंच विष्णू कालप, गोरेगाव महाविकास आघाडी सरपंच जुबेर अब्बाशी, होडगाव महाविकास आघाडी सरपंच बळीराम खाडे, कुमशेत ठाकरे गट सरपंच सचिन कदम, दहिवली कोंड महाविकास आघाडी सरपंच मुस्ताक बंदरकर, मांगरूळ शिंदे गट सरपंच शितल वारिक, पहेल महाविकास आघाडी सरपंच करिष्मा मांजरे, हरकोल महाविकास आघाडी सरपंच फाईजा हूर्जुक, नांदवी महाविकास आघाडी सरपंच विनया नांदविकर, कुंभे शिंदे गट सरपंच प्रणाली भागडे, पळसप शिंदे गट सरपंच लक्ष्मण केंबळे, करंबेळी महाविकास आघाडी सरपंच कल्पेश मोरे, टोळ खुर्द शिंदे गट सरपंच आरती सुतार असे सरपंच पदी निवडून आले आहेत. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत व फटाके फोडून प्रशासकीय भवनापासून मिरवणूक काढून आपला आनंद साजरा केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार प्रियांका आयरे व त्यांचे सहकारी नायब तहसीलदार भाबड यांनी काम पाहिले तर पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

“माणगाव तालुक्यात 15 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची एक हाती सत्ता आली असून 7 सरपंच हे उद्धव ठाकरे गटाचे बसले आहेत. निजामपूर विभागात ज्या ग्रामपंचायत होत्या त्या सर्व ग्रामपंचायत वर महाविकास आघाडीने बाजी मारली असून मिंधे गटाला जनतेने त्यांची जागा दाखवली आहे”

– अनिल नवगणे, दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख उद्धव ठाकरे गट

“माणगावच्या जनतेने पन्नास खोक्यांना झिडकारले असून महाविकास आघाडीला स्वीकारले आहे. ते या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून स्पष्ट दिसत आहे. माणगाव मध्ये बहुतांश ग्रामपंचायत या राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे गटाला मिळाल्या आहेत. हा जनतेने दिलेला कौल आहे”

-बाबुशेठ खानविलकर, महाड, पोलादपूर, माणगाव राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष 

खासदार सुनील तटकरे यांच्यासारखा विकास पुरुष कोणी होणार नाही. जनतेचा तटकरे साहेब तसेच आमदार आदिती तटकरे यांच्यावर मोठा विश्वास आहे म्हणूनच माणगावच्या जनतेने महाविकास आघाडीला निवडून दिले आहे.

– दीपक जाधव,युवक सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य

साई ग्रामपंचायत निवडणूक ही मोठी अटीतटीची निवडणूक होती.साई ग्रामपंचायत मधील जनतेने खासदार सुनील तटकरे, आमदार अदिती तटकरे यांनी केलेल्या विकास कामांवर विश्वास ठेवून जनतेने महाविकास आघाडीला विजयी केले असून साई ग्रामपंचायतचा हा महत्त्वाचा विजय आहे.

– संगीता भक्कम,माणगाव तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here