Home latest News श्रीवर्धनमध्ये विकासाला नवी दिशा; पक्ष प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला वाढती साथ
श्रीवर्धनमध्ये विकासाला नवी दिशा; पक्ष प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला वाढती साथ
निलेश भुवड
श्रीवर्धन तालुका प्रतिनिधी
मो. 8149679123
श्रीवर्धन |श्रीवर्धनच्या सर्वांगीण प्रगतीसाठी गेल्या पंधरा वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत, आगामी काळातही हा विकासाचा वेग अधिक वाढणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. श्रीवर्धन मोहल्ला येथे आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.
खासदार तटकरे म्हणाले की, “पर्यटन क्षेत्रात झालेल्या सकारात्मक बदलांमुळे श्रीवर्धनची ओळख राज्यातून आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचू लागली आहे. वाढत्या पर्यटकांमुळे स्थानिकांना नव्या रोजगारसंधी उपलब्ध होत असून व्यापार आणि अर्थकारणालाही गती मिळत आहे.” त्यांनी या बदलांसाठी स्थानिक जनतेच्या सहकार्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
या सोहळ्यास महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, तालुका अध्यक्ष दर्शन विचारे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र सातनाक, माजी आमदार तुकाराम सुर्वे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते.
कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील जुनेद दुस्ते, शोहेब हमदुल्ले, इरफान सोनाले, सलमान सोनाले यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाला नवी ताकद दिली.
मंत्री अदिती तटकरे यांनी यावेळी मागील सोळा वर्षांत श्रीवर्धनमध्ये पूर्ण झालेली आणि सुरू असलेली विविध विकासकामे, पायाभूत सुविधा, जलसंधारण आणि पर्यटन विकास प्रकल्पांची माहिती उपस्थितांना दिली.
यामुळे श्रीवर्धनमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणात नवचैतन्याची भर पडली आहे.