Home latest News अलिबागमध्ये कलारंग व कोमसाप अलिबाग तर्फे जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन

अलिबागमध्ये कलारंग व कोमसाप अलिबाग तर्फे जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन

143

अलिबागमध्ये कलारंग व कोमसाप अलिबाग तर्फे जिल्हा मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या अनुदानातून आणि ‘कलारंग’ सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था अलिबागच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोकण मराठी साहित्य परिषद अलिबाग शाखेच्या सहकार्याने अलिबाग येथे जिल्हा साहित्य संमेलन नुकतेच संपन्न झाले. पूर्ण दोन दिवस सुरू असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नामांकित कवी, गीतकार, अरुण म्हात्रे होते. तर ज्येष्ठ साहित्यिक तथा कोकण मराठी साहित्य परिषद अलिबाग शाखा अध्यक्ष रमेश धनावडे हे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. भरत गावडे व विठ्ठल कदम हे महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ सदस्य, तसेच कलारंगचे प्रकल्प वाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.

संमेलनात प्रथितयश कवींसह नवोदित कवींसाठी व्यासपीठ मिळाले. रायगड मधील मान्यवर गझलकार यांच्या गझलांचा कार्यक्रम खूप छान झाला. यामध्ये सूत्रसंचालक हेमंत बारटक्के (इंदापूर) तसेच गझलकार ज्योस्ना राजपूत (पनवेल), नागेश नायडू (गोरेगाव), सिद्धेश लखमदे (मुरुड-जंजिरा), योगेश दवटे (मुरुड-जंजिरा), तेजस पाटील (अलिबाग), संध्या दिवकर (रोहा), मानसी चापेकर( रोहा) सुभाष कटकदौंड (खोपोली) यांनी सादरीकरण करून रसिकांची वाहवा मिळवली. तसेच या साहित्य संमेलनात भाषेचे पैलू, मराठी प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांवरील परिसंवाद, असे अनेक कार्यक्रम सादर केले गेले. सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली ‘उंच माझा झोका ‘ फेम कवीवर्य अरुण म्हात्रे यांची रमेश धनावडे यांनी घेतलेली मुलाखत अतिशय दर्जेदार झाली. अभिवाचन तथा कथाकथन अशा विविध साहित्यिक पैलूंनी सजलेले साहित्य संमेलन हे दोन दिवसांसाठी जिल्ह्यातील साहित्य रसिकांसाठी एक पर्वणीच होती.

दरम्यान काव्यलेखन, कथालेखन आणि दिवाळी अंक स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले. यामध्ये जिल्हाभरातून शंभराहून अधिक कविता, पंचवीस कथा तर अकरा दिवाळी अंकांच्या संपादकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. दिवाळी अंक स्पर्धेत कांतिलाल कडू यांचा निर्भिड लेख प्रथम, प्रमिला जोशी यांचा साहित्यविश्व द्वितीय, अँड.रत्नाकर पाटील यांचा श्री समर्थ विचार तृतीय तर विजय पवार यांचा इंद्रधनु उत्तेजनार्थ विजेते ठरले. स्त्री साहित्यावर आधारित तिच्या गोष्टी या कार्यक्रमांमध्ये श्रद्धा पोखरणकर. आदिती साष्टे, सुजाता पाटील यांनी सहभाग घेतला.

सदर दिमाखदार सोहळ्यासाठी ‘कलारंग’ सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था अलिबागचे प्रकल्प वाणी, विकास पाटील, विजय म्हात्रे, रुपेश पाटील, दीपक पाटील, जयवंत वाणी, पुनम धनावडे, तसेच मिसेस प्रकल्प आणि यांनी परीश्रम घेतले असून ॲड. प्रसाद पाटील, नागेश कुलकर्णी, सुजाता पाटील, ॲड. विलास नाईक, संजिवनी नाईक, संजय गुंजाळ, महेश कवळे, वैभव धनावडे, शरद कोरडे आदींचे मार्गदर्शन लाभले. या नेत्रदीपक उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रतिम सुतार तर बक्षीस वितरण आणि समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन महेश कवळे यांनी केले. अखेर स्वागताध्यक्ष रमेश धनावडे यांनी साहित्य संमेलन यशस्वी करणाऱ्या आयोजकांसहित हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले. ‎दोन दिवस रंगलेल्या या साहित्य संमेलनामध्ये रायगडच्या साहित्यिकांनी आवर्जून सहभाग घेतला व त्याचा आस्वाद रसिकजनानी मनापासून घेतला.