पनवेल-पनवेल महापालिकेत सत्ताधारी आणि प्रशासनाचा वाद थांबायचे नाव घेत नाही. १७ फेब्रवारीची तहकूब झालेली सभा ठरल्याप्रमाणे बुधवारी घेण्यात आली. सुरुवातीपासूनच सुरू असलेला वाद प्रश्नोत्तराच्या तासात विकोपाला गेला स्वच्छता सर्वेक्षणाच्या विषयावर चर्चा करीत असताना सत्ताधारी आणि प्रशासनाचा शाब्दीक वाद झाला. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांच्या वादाला कंटाळून सभात्याग केला. प्रशासनाचा निषेध करीत सत्ताधाऱ्यांनी काही काळ सत्ताधाऱ्यांशिवाय सभा चालवली.
पनवेल महापालिकेत सुरू असलेला प्रशासन विरुद्ध सत्ताधारी हा वाद बुधवारी विकोपाला गेला. स्वच्छता सर्वेक्षणाच्या विषयावर चर्चा करीत असताना हा वाद झाला. सभागृह नेते परेश ठाकूर आणि स्थायी समिती सभापती अमर पाटील यांनी प्रशासन स्वच्छ सर्वेक्षणात काम करीत असेल तर शहरात अस्वच्छता कशी काय, असा सवाल केला. महापालिकेकडून कारवाई होत नाही, उघड्यावर लघुशंका करणे, थुंकणे, कचरा टाकणे यांच्यावर आजवर कारवाईचे आकडे अतिशय तोकडे आहेत, असे आरोप करीत प्रशासन झोपी गेले आहे, असा थेट हल्ला चढवला. आयुक्त डॉ. शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांच्या आरोपाचे खंडन करीत प्रशासन कमी कर्मचारीसंख्या असतानाही चांगले काम करीत असल्याचे सांगितले. परेश ठाकूर यांनी मात्र प्रशासन चांगले काम करीत आहे तर मग शहरात कचरा कसा काय, असा प्रश्न उपस्थित केला.
स्वच्छता सर्वेक्षणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही अमर पाटील यांनी केला. त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ झाला. आयुक्तांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेऊन ते बाहेर पडले. गोंधळामुळे महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी अर्ध्या तासासाठी सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. आयुक्त शिंदे यांनी मात्र प्रशासनालादेखील येथे न थांबण्याचे आदेश दिल्याने सर्व कर्मचारी निघून गेले. पुन्हा अर्ध्या तासानंतर सभा सुरू झाल्यानंतर मात्र सभागृहात प्रशासनाकडून नगरसचिव अनिल जगधनी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीही उपस्थित नव्हते. प्रशासनाच्या या वागणुकीचा सत्ताधाऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करीत आम्ही सभा चालवू, असे सांगून काही काळ सभा चालवली. सत्ताधारी प्रशासनाशी चांगले वागत नाहीत, असा आरोप करत काही वेळाने विरोधकांनीदेखील सभात्याग केला. सत्ताधाऱ्यांनी काही वेळानंतर सभा तहकूब केली. तहकूब केलेल्या या सभेत विषय पटलावरील एकही विषय मंजूर न करताच हा प्रकार घडला. त्यामुळे ही सभा पुन्हा घ्यावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here