पोटभर खाऊन भाजप नेते उपोषणावर, बातमी देणाऱ्या पत्रकारावर गुन्हा दाखल.
SYL Canal : सतलज यमुना लिंक कालव्याच्या समर्थनार्थ उपोषणाला बसलेल्या भाजप नेत्यांच्या खाण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर हा व्हिडिओ काढणाऱ्या पत्रकारावर एका जुन्या प्रकरणात गोवण्यात आल्याचं समोर येतंय.
हरियाणा :– कुरुक्षेत्र भारतीय जनता पक्षानं हरयाणामध्ये सतलज यमुना लिंक (SYL Canal ) कालव्याच्या समर्थनार्थ शनिवारी सर्व मुख्यालयांना एका दिवसाच्या उपोषणाचं आवाहन केलं होतं. यामध्ये भाजपचे अनेक खासदार, आमदार सहभागीही झाले होते. परंतु, उपोषणात सहभागी होण्यापूर्वी पोटभरून खाऊन घेत असलेल्या भाजप नेत्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यानंतर हा व्हिडिओ बनवणाऱ्या स्थानिक पत्रकाराला एका जुन्या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय.
पत्रकारावर गुन्हा दाखल
माहितीनुसार, राजिंदर सनेही असं या पत्रकाराचं नाव आहे. एका न्यूज वेब चॅनलसाठी ते काम करतात. राजिंदरवर हरयाणाच्या कुरुक्षेत्रमध्ये आयटी कायद्यानुसार २२ डिसेंबर रोजी एक गुन्हा दाखल करण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे, मार्केट कमिटीचे माजी चेअरमन सुरेश सैनी यांनी जवळपास दिलेल्या तक्रारीनंतर १० महिन्यांनी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ‘पत्रकारानं आपल्याविरोधात खोट्या बातम्या सोशल मीडियावर पसरवल्याचा’ आरोप सैनी यांनी जवळपास १० महिन्यांपूर्वी केला होता.