भारत आणि अमेरिका मैत्री
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
मो: ९९२२५४६२९५
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा भारत आणि अमेरिका मैत्री संबंधासाठी मैलाचा दगड ठरला आहे. भारत आणि अमेरिका हे जागतिक पटलावरील दोन अतिशय महत्वाचे देश आहेत. दोन्ही देश लोकशाहीचे पाईक आहेत. अमेरिका हा जगातील सर्वात जुनी लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे तर भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असलेला देश आहे. त्या अनुषंगाने दोन्ही देशांमधील मैत्री लोकशाहीच्या भविष्यासाठी महत्वाची ठरणारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा काही पहिलाच अमेरिका दौरा नाही याआधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौरा केला आहे मात्र यावेळेचा दौरा विशेष आहे
कारण या दौऱ्याने भारत आणि अमेरिका मैत्री पर्वाच्या नव्या युगाची सुरवात झाली आहे. या दौऱ्यात दोन्ही देशांकडून संरक्षण विषयक अनेक करार करण्यात आले. जनरल इलेक्ट्रिकचा हिंदुस्थान एरनॉटिक्स सोबत लढाऊ विमानांसाठी जेट इंजिन बनवण्याचा महत्वपूर्ण करार आहे. २०२५ पूर्वी अमेरिका चंद्रावर माणूस पाठवण्याची मोहीम आखणार आहे या मोहिमेत ते भारताला समाविष्ट करून घेणार आहे याबाबतचा करारही या दौऱ्यात करण्यात आला. हे दोन्ही करार खूप महत्वाचे आहेत कारण या करारामुळे भारत आणि अमेरिका संबंध जमिनिपुरते मर्यादित न राहता अंतराळात पोहचणार आहे. वास्तविक अमेरिका आणि भारत यांच्यात मैत्री असणे ही काळाची गरज आहे. जागतिक राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ही मैत्री असेल.
अमेरिका ही जागतिक महासत्ता आहे तर भारत ही वेगाने विकसित होणारी महासत्ता आहे या दोन महासत्ता एकत्र आल्या तर चीन सारख्या महासत्तेला आव्हान देता येईल. या दौऱ्यामागचे खरे कारण हेच असण्याची शक्यता आहे. मागील दोन दशकात चीन अमेरिकेच्या वर्चस्वाला चीन आव्हान देत आहे. चीनचे हे आव्हान मोडून काढण्यासाठी अमेरिकेला भारताची सोबत हवी. कारण चीनला जशास तसे उत्तर देणारा आशिया खंडातील एकमेव देश म्हणजे भारत. भारत आणि चीन यांच्यातील शत्रुत्व जगजाहीर आहे. भारत आणि अमेरिकेचा चीन हा समान शत्रू आहे त्यामुळेच शत्रूचा शत्रू हा आपला मित्र या नात्याने हे दोन देश एकत्र आले आहेत कदाचित त्यामुळेच चीनचा तिळपापड होत आहे. चीनने पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावर टीका केली आहे पण दोन्ही देशांनी चीनच्या टिकेकडे दुर्लक्ष केले आहे. चीनच्या वाढत्या वर्चस्वाला शह देण्यासाठी हा दौरा खूप महत्वाचा ठरणार आहे.
वास्तविक अमेरिका आणि भारत या दोन देशात सलोख्याचे संबंध असले तरी या दोन्ही देशात घट्ट मैत्री नव्हती. शीत युद्धाच्या काळात भारताची रशियाशी मैत्री असल्याने अमेरिकेने पाकिस्तानला जवळ केले त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेने कायम पाकिस्तानची तळी उचलली त्यात १९९८ साली जेंव्हा अटलबिहारी वाजपेयी यांनी अणूचाचण्या केल्या तेंव्हा तर दोन्ही देशात कमालीची कटुता निर्माण झाली होती. अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले होते पण या सर्व गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. मागील पंधरा वीस वर्षांत विशेषतः मनमोहनसिंग आणि बराक ओबामा यांच्या काळात सुरू झालेले मैत्री पर्व आज मोदी आणि बायडेन यांच्या काळात आणखी घट्ट झाले आहे. केवळ भारत आणि अमेरिकेसाठीच नव्हे तर जागतिक राजकारणासाठीही अत्यंत महत्वाची घडामोड आहे.