Home रायगड परतीच्या पावसाचा रायगड जिल्ह्यातील शेतीला फटका

परतीच्या पावसाचा रायगड जिल्ह्यातील शेतीला फटका

78

भात पिकाला आले कोंब,पेंढाही शेतात कुजला

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग- (Alibag)रायगड जिल्ह्याला मागील आठवडाभरापासून कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. दिवसभर उन्ह आणि सायंकाळनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन वादळीवाऱ्यासह येणाऱ्या पावसात कापणीसाठी तयार झालेल्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. कापलेले भातपीक शेतातच राहिल्याने त्याला कोंब आले असून, पेंढा भिजल्याने तो कुजण्याची भीती आहे. त्यामुळे आगामी काळात गुरांच्या पेंढ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

फक्त घोषणा नको, तात्काळ मदत द्याः कृष्णकांत पाटील यांची मागणी
अलिबाग तालुक्यात काही ठिकाणी वाऱ्या पावसामुळे उभी पिके शेतात आडवी झाली आणि धानाची मोत्यासारखी कणस चिखलात गाढली गेली. कापणी केलेले पीक त्याची कडपे पावसात भिजल्याने मोड आले, साठवलेले धान्य ओलाव्याने नासधूस झाले आहे. शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावूनच गेल्यामुळे त्याच्या डोळ्यात अश्रूचे पाट वाहू लागले असून, तो हताश आणि चिंतेत आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वेळेत पंचनामे करून नुसत्या घोषणा न करता, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या, अशी मागणीअखिल भारतीय मानव अधिकार संघटनाचे जिल्हा प्रमुख कृष्णकांत पाटील यांनी सरकारकडे केली आहे.अलिबाग तालुक्यातील खारेपाठ विभागातील , रेवस ,हाशिवरे,माणकुळे,शिरवली,नारंगी,फोफेरी, पेढांबे,वाघ्रण,सातघर,लोणघर, कोपर,चरी,शहापूर, शहाबाज,पोयनाड भागातील शेतकऱ्यांचे काढणीला आलेल्या पिकाचे पूर्णतः नुकसान झाले आहे. शेकडो हेक्टर शेतजमिनीतील पीक अक्षरशः चिखलात आडवे पडले आहे. काही पिकांची पूर्णतः नासाडी झाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपासमारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बळीराजाचे डोळे आता नुकसानभरपाई आणि मदतीकडे लागलेले आहेत. त्यामुळे शेतकरी बळीराजाला नुसती घोषणा नको तर त्याच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून त्याला ताबडतोब मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.असून अलिबाग प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना लेखी निवेदनातून करण्यात येणार असल्याचे कृष्णकांत पाटील यांनी सांगितले.

पावसामुळे शेतकरी देशोधडीला

रायगड जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून झालेल्या अवकाळी आणि मुसळधार पावसामुळे भातशेतीचे 100 टक्के नुकसान झाले असून, शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी थेट राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र लिहून तात्काळ विशेष हेक्टरी मदत पॅकेज देण्याची मागणी केली आहे.
प्रसाद भोईर यांनी पत्रात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी प्रचंड आशेने केलेली भातशेती काढणीच्या तोंडावर पाण्यात बुडाली. शेतामध्ये पाणी साचल्याने भातपिके कुजली आहेत, कणसांना जागेवरच कोंब फुटले आहेत, तर काही ठिकाणी शेतजमीन वाहून गेली आहे. शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत आणि गुंतवणूक अक्षरशः एका झटक्यात पाण्यात गेली आहे, शेतकरी पुरता उध्वस्त झाला आहे, जगावे की मरावे अशी अवस्था त्याची झालीय असे त्यांनी नमूद केले.प्रसाद भोईर यांनी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कुठलाही निकष न लावता तातडीने सरसकट पंचनामे सुरू करावेत आणि 10 दिवसांच्या आत अहवाल सादर करावा.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष मदत म्हणून त्वरित मंजूर करून थेट रक्कम जमा करावी. कृषी आणि महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून नुकसानीचा सविस्तर अहवाल द्यावा. भविष्यात शेतकऱ्यांना पुन्हा शेतीत उभे राहता यावे यासाठी ‘चालू पीक कर्ज माफ करून’ पुढील हंगामासाठी पुनर्गठित मदत योजना जाहीर करावी, या मागण्यांचे निवेदन कृषीमंत्री भरणे यांना दिले आहे.