महाराष्ट्र राज्य अनुसूचीत जाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲङ धर्मपाल मेश्राम यांची भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेला भेट
अभिजीत आर. सकपाळ
ठाणे ब्युरो चीफ
9960096075
महाराष्ट्र राज्य अनुसूचीत जाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) ॲङ धर्मपाल मेश्राम यांनी आज दिनांक 28.10.2025 रोजीच्या भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या नियोजीत दौऱ्यादरम्यान बैठक घेऊन विविध विभागांचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये त्यांनी महानगरपालिकेचा एकूण अर्थसंकल्प, त्यामधुन बांधील खर्च वजा करता उर्वरीत महसुली जमा रक्कमेमधून 5% दुर्बल घटकांसाठी किती निधीची तरतुद करण्यात आली आहे, याचा आढावा घेतला. वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत शहरातील 137 खाजगी रुग्णालयांच्या परवान्यांचे नुतनीकरण करण्यात आले असून, त्यापैकी किती रुग्णालयांमध्ये दुर्बल घटाकांसाठी खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत याचा अहवाल 1 महिन्याच्या आत अनुसूचित जाती आयोगास सादर करण्याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी श्री. संदिप गाडेकर यांना सूचना देण्यात आली. तसेच, महिला व बाल कल्याण विभागामार्फत दिव्यांग, दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा देखील आढावा घेण्यात आला. महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेषत: सफाई कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक तातडीने अद्ययावत करुन त्याबाबतची यादी 15 दिवसात आयोगास सादर करण्याबाबत आस्थापना विभागप्रमुख यांना सुचित केले. बैठकीचा समारोप करताना आयोगाचे उपाध्यक्ष यांनी नमुद केले की, आजच्या बैठकीचा प्रमुख उद्देश होता की, शहरातील दुर्बल घटक व अनुसूचीत जातीच्या घटकांना विविध लाभ उपलब्ध करुन देणे. त्यांना न्याय देणे हे, आपले सर्वांचे आद्य व प्रथम कर्तव्य आहे. या घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांचा विकास करणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. तसेच
महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री.अनमोल सागर (भा.प्र.से.) यांनी मा. उपाध्यक्ष महोदयांचे आभार मानून बैठक समाप्त केल्याचे जाहीर केले. सदर बैठकीस सर्व संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.









