Home अलिबाग चक्रीवादळाचा इशारा : रायगड जिल्ह्यात खोल समुद्रातील मासेमारी थांबली

चक्रीवादळाचा इशारा : रायगड जिल्ह्यात खोल समुद्रातील मासेमारी थांबली

158

 ३ हजार बोटी सुरक्षितपणे परतल्या किनाऱ्यावर

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या संभाव्य चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांमध्ये खबरदारीची भावना निर्माण झाली आहे. खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सुमारे ३ हजार बोटी समुद्रकिनाऱ्यावर परत आल्या असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात एकूण ३५०० मासेमारी बोटी नोंदणीकृत असून, यापैकी बहुतेक बोटी सध्या किनाऱ्यावर परतल्या आहेत. उर्वरित बोटींच्या सुरक्षित परतीसाठीही प्रशासन आणि बंदर विभाग सतत संपर्कात आहे.

चक्रीवादळाचा इशारा मिळताच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क झाली आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, स्थानिक ग्रामपंचायती, सागरी सुरक्षा पथक आणि पोलिस दल यांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सागर पाठक यांनी सांगितले की,
“सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व बोटींची नोंद घेण्यात आली असून मच्छीमारांना सुरक्षित ठिकाणी थांबण्यास सांगण्यात आले आहे. हवामान विभागाच्या पुढील सूचना लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेतला जाईल.”

चक्रीवादळामुळे सागरी लाटांची तीव्रता वाढल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रातील मासेमारी पूर्णपणे थांबवली असून, किनाऱ्यावरील गावांमध्ये सतर्कतेचे वातावरण आहे. प्रशासनाकडून हवामान स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.