Home रायगड फार्महाऊसच्या बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा महिला व मुलींचे गुप्तपणे चित्रीकरण

फार्महाऊसच्या बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा महिला व मुलींचे गुप्तपणे चित्रीकरण

201

फार्महाऊसच्या बाथरुममध्ये स्पाय कॅमेरा
महिला व मुलींचे गुप्तपणे चित्रीकरण

अरुणकुमार करंदीकर
पनवेल शहर प्रतिनिधी
मो.क्र . 7715918136

पनवेल – ( प्रतिनिधी ) पनवेल तालुक्याच्या तळोजा येथील धानसर गावातील रियांश फार्म हाऊसच्या निवासी व्यवस्थापकाने ( मॅनेजर ) बाथरुममध्ये गुप्तपणे हिडन स्पाय कॅमेरा लावुन महिलांचे व मुलींचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण केले असल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे. यावरून असे घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना कायद्याचा धाक राहिला आहे का ? पनवेलमध्ये महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे ? सदर गुन्हा जरी तळोजा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत घडला असला तरी पनवेल तालुक्यात ठिकठिकाणी अनेक घृणास्पद प्रकार घडत आहेत.अशा प्रकरणांमुळे पनवेलमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबद्दल शासन प्रशासन काय करत आहे ? असा सवाल करणा- या पनवेलमधील महिला वर्गात तीव्र असंतोष धुमसत असुन ह्या प्रकरणाबाबत महिलांनी संताप व्यक्त केला आहे.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे आहे की, पनवेलमध्ये तळोजा येथे एक कुटुंब पिकनिकसाठी आले होते. तेव्हा सदर कुटुंब विश्रांतीसाठी धानसर गावातील रियांश फार्म हाऊसवर मुक्कामी थांबले होते. यादरम्यान रात्री दोनच्या सुमारास सदर कुटुंबातील एका महिलेला बाथरूमच्या कोप-यात आरशामागे सुक्ष्म आकाराची लाईट चमकताना दिसली. संशय आल्यावर ती वस्तु काय आहे. हे तपासल्यावर तिथे हिडन स्पाय कॅमेरा लपविला असल्याचे लक्षात आले म्हणून त्या महिलेने तात्काळ आपल्या सोबत असलेल्या नातेवाईकांना सर्व हकीगत सांगितली. तेव्हा नातेवाईकांनी बाथरुममध्ये जाऊन तपासणी केली असता तो स्पाय कॅमेरा असल्याचे त्यांच्याही निदर्शनास आले. लगेचच त्या महिलेसह सर्वजण फार्म हाऊसच्या व्यवस्थापकाकडे चौकशी व जाब विचारण्यासाठी गेले असता त्यावेळी फार्म हाऊसचा व्यवस्थापक बाथरुम मधील चित्रीत केलेलेच व्हिडिओ पाहत असल्याचे सर्वांना दिसुन आले.

फार्म हाऊसचा व्यवस्थापक बाथरुमचेच व्हिडिओ पाहत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पर्यटक महिला व तिच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. तेव्हा तपासणीअंती बाथरुममध्ये आरशाच्या मागे व्यवस्थापकानेच हिडन स्पाय कॅमेरा बसविल्याचे आढळून आले. यावेळी प्राथमिक चौकशीत बाथरुममध्ये गुप्त कॅमेरा लावुन महिलांचे व मुलींचे अश्लील व्हिडिओ प्राप्त केले असल्याची व्यवस्थापकाने कबुली दिली. याप्रकरणी रियांश फार्म हाऊसचा व्यवस्थापक मनोज भगवान चौधरी ( वय – 35 , रा. रांजणपाडा, खारघर ) याला तात्काळ तळोजा पोलिसांनी अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता फोनमध्ये सुमारे 17 अश्लील व्हिडिओ पोलिसांना आढळून आले आहेत.

आरोपीच्या मोबाईलमध्ये काही महिलांचे अंघोळ करतानाचे व कपडे बदलतानाचे व्हिडिओ पोलिसांना आढळले आहेत. यामध्ये काही तरुणी व अल्पवयीन मुलींचे व्हिडिओ असल्याचेही समोर आले आहे. आरोपी कडील मोबाईल व लॅपटाॅप जप्त केले आहे. काही व्हिडिओ यापूर्वीच डिलीट केल्याची कबुली आरोपीने पोलिस तपासादरम्यान दिली आहे. त्याच अनुषंगाने डिलीट केलेले व्हिडिओ प्राप्त करण्यासाठी सायबर तज्ञांच्या मदतीने डिलीट डेटा रिकव्हर करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असल्याचे म्हटले आहे.

याप्रकरणी आरोपी मनोज चौधरी याच्यावर तळोजा पोलिस ठाण्याच्या अधिका-यांनी पोक्सो कायद्यासह इतर आणखी कलमान्वये गुन्हे दाखल केले असुन आरोपीला पनवेल न्यायालयाने तात्काळ पोलिस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. यासंदर्भात तळोजा पोलिस ठाण्याचे अधिकारी पोलिस निरीक्षक निकम साहेब अधिक तपास करत आहेत.