रायगड जिल्ह्यातील भातशेतीला अवकाळी पावसाचा फटका; मंत्री भरत गोगावले यांचा नुकसानग्रस्त शेतांची पाहणी दौरा
सिद्धेश पवार,
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
8482851532
मागील आठवडाभर सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीवर मोठा फटका बसला आहे. अनेक तालुक्यांतील भात पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री नामदार भरत गोगावले यांनी आज थेट शेतशिवारात जाऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. पाहणी दरम्यान त्यांच्यासोबत जिल्हा प्रशासनातील शासकीय अधिकारी तसेच जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री गोगावले यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना “भातशेतीचे सरसकट पंचनामे करून तातडीने मदतकार्य सुरू करावे” असे स्पष्ट निर्देश दिले.
सध्या अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांना भात पीक कापणी करणे अशक्य झाले आहे. त्यामुळे कष्टाचे पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहून शेतकरी हताश झाले आहेत.
मंत्री गोगावले यांनी आश्वासन दिले की, शेतकऱ्यांना योग्य आणि तत्काळ मदत मिळेल, तसेच शासनस्तरावर नुकसानभरपाईसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा आता शासनाच्या मदतीकडे लागल्या असून, योग्य वेळी आर्थिक सहाय्य मिळाल्यास त्यांना या संकटातून सावरणे शक्य होईल.









