मुंबई मलंगगड येथील नदीत बुडून दोघांचा दुर्दैवी मृत्यू, 24 तासांनी मृतदेह मिळाले.

✒️नीलम खरात✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई/कल्याण,दि23 जुलै:- मुंबईच्या उपनगर असलेल्या ठाणे जिल्हातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नदीत पोहण्याचा मोह आवरला नाही, नदीत उतरलेल्या दोन युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड परिसरात घडली आहे. या दोघांचे मृतदेह एनडीआरएफच्या चमूने तब्बल 24 तासांनंतर नदी बाहेर काढले.
राज्यात मागिल काही दिवसापासून सतत पाऊस बरसत आहे. नदी नाले धबधबे मोठ्या प्रमाणात तंबून वाहत आहे. जिल्हा आणि महानगर प्रशासनाकडून ठाणे जिल्हाच्या हद्दीत पर्यटकांना नदी, धबधबा आणि तलाव क्षेत्रात जाण्यास बंदी करण्यात आली आहे. तरीही पर्यटक अशा ठिकाणी जात असल्याने प्रशासनाचं लक्ष आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कल्याणच्या कोळसेवाडी परिसरात राहणारा 18 वर्षीय इशांत मोहाडीकर आणि 20 वर्षीय विनायक परब हे दोघे गुरुवारी (22 जुलै) मलंगगड भागात अन्य एका मित्रासह फिरण्यासाठी आले होते. चिंचवली परिसरातील नदीत हे दोघे पोहण्यासाठी उतरले. तर त्यांच्या एका मित्राला पोहता येत नसल्याने तो बाहेरच थांबला. मात्र नदीच्या पाण्याला प्रचंड प्रवाह असल्याने पाण्यात उतरलेले आणि काही वेळेतच नदीच्या पाण्यात ते डुबु लागले त्यामुळे इशांत आणि विनायक यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दोन युवक नदी पात्रात बुडाल्याची माहिती प्रशासना मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि दिवसभर या दोघांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे आज अखेर एनडीआरएफच्या टीमने याठिकाणी येत शोधकार्य सुरू केलं. यावेळी एका तरुणाचा मृतदेह दुपारी साडेबारा वाजता, तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह संध्याकाळी साडेपाच वाजता सापडला. हे दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेनंतर मलंगगड परिसरात येणाऱ्या पर्यटकांना रोखणं गरजेचं असल्याचं मत पुन्हा एकदा व्यक्त होतंय.








