मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात गॅस गळती; मोठी दुर्घटना टळली, 58 रुग्णांना हलवले.

✒️नीलम खरात✒️
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई,दि.7 ऑगस्ट:- मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात एल.पी.जी गॅस गळती झाल्याची माहिती मिळाली आहे. गॅस गळती झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने जवान घटनास्थळी तातडीने घाव घेतली असून, 8 गाड्या रवाना झाल्या आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील 58 रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, यापैकी 20 जण कोरोना रुग्ण असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय हे चिंचपोकळी परिसरात आर्थर रोडजवळ आहे. इथे एल.पी.जी गॅस पाईपलाईन लीक झाली. सकाळी 12 वाजताच्या दरम्यान गॅस गळती झाल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. ज्या ठिकाणी गॅसची गळती झाली आहे, तिथे अधिक रुग्ण नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली, असे सांगितले जात आहे.
रुग्णालयात असलेल्या रुग्णाचा आणि नागरिकाच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांनाही अन्य ठिकाणी जाण्यास सांगण्यात आल्याचे म्हटले जात आहे. एल.पी.जी गॅस गळती नेमकी कशामुळे झाली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. रुग्णालयात एलपीजी गॅसची गळती झाल्याचे समजताच इमारतीतील सर्व रुग्णांना व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली.








