फर्दापूर येथील ५५० एकर जमीन पर्यटन विकास महामंडळातर्फे अधिग्रहित

मीडिया वार्ता न्युज
१६ फेब्रुवारी, मुंबई: औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्धतेसह सर्व प्रक्रिया तात्काळ पूर्ण करुन बांधकामास प्रत्यक्षात सुरूवात करण्यात यावी, असे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
मंत्रालयात शिवस्मारक व भीम पार्क उभारण्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गटने, पर्यटन उपसंचालक, औरंगाबादचे जिल्हा क्रीड़ा अधिकारी, जिल्हा समाजकल्याण अधिकारी,तहसीलदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
महसूल राज्यमंत्री श्री.सत्तार म्हणाले, अजिंठा या जगप्रसिद्ध लेण्यांना देश-विदेशातून पर्यटक भेट देत असतात. या लेण्यांच्या सभोवताली सिल्लोड व सोयगाव शहराच्या परिसरात एकात्मिकरीत्या पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी अजिंठा-वेरूळ संवर्धन व विकास प्रकल्प यांची आखणी करण्यात आली. फर्दापूर येथील ५५० एकर जमीन पर्यटन विकास महामंडळातर्फे अधिग्रहित करण्यात आली आहे.
हे आपण वाचलंत का ?
- मुलुंडचा दलाल’ म्हणत संजय राऊतांचे किरीट सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप
- मुंबईतून घसरलेला मराठी टक्का आणि महाराष्ट्र संरक्षण संघटना
- आयपीएल लिलावामध्ये करोडोंचे व्यवहार करताना ऑक्शनर ह्यूज एडमीड्स चक्कर येऊन का पडले?
महाराष्ट्रात जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांचे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून असलेले महत्त्व आणि या लेण्यांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट देश-विदेशातील पर्यटकांसमोर मांडणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध कौशल्य, त्यांनी प्रजेला दिलेले न्याय, अष्टप्रधानमंडळ, शत्रुसोबतच्या वेगवेगळ्या घटना, घडामोडी, युद्धांना मुत्सद्दीपणाने दिलेले प्रत्युत्तर, हा सर्व जीवनपट महाराजांच्या स्मारकाच्या रुपात साकारण्यात येणार आहे. स्मारकाच्या परिसरात महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री श्री.सत्तार त्यांनी सांगितले.
कसे असेल भीमपार्क?
दहा एकरवर पसरलेल्या या भीमपार्कमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि धार्मिक विषयांवरील लिखाण साहित्य विविध भाषेमध्ये पर्यटकांसाठी उपलब्ध केले जाईल. बाबासाहेबानी महिला, कामगार यासाठी केलेल्या कार्याची माहिती ह्याठिकाणी लोकांना दिली जाईल. भीम पार्कमध्ये माता रमाई आणि सम्राट अशोक यांच्याबद्दल माहिती देणाऱ्या दालनं उभारण्यात येतील. तसेच भीमपार्कमध्ये गौतम बुद्धांची भव्य मूर्ती उभारून इथे विविध बुद्धिस्ट महोत्सव साजरे करण्यात येतील.