Home latest News कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराजांना अभिवादन

कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराजांना अभिवादन

99

कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराजांना अभिवादन

कर्मयोगी संत गाडगेबाबा महाराजांना अभिवादन

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५📱
📞८७९९८४०८३८📞

मोहाडी :- लय दुरुन आलो मी थकुनी मोळी, जंगलातून आणुनी टाकिली तुझ्या अंगणी, पाणी वाढ ग माय अन्न वाडग. संत गाडगे महाराजांना जेव्हा भूक लागायची तेव्हा ते जंगलामध्ये जात. काळ्या जमा करत, त्याची मोळी बांधत व गावामध्ये आणत आणि एखाद्या घरी टाकायचे व त्या माऊलीला म्हणायचे पाणी वाढ ग माय अन्न वाढग, गाडगे महाराजांनी आम्हाला श्रमप्रतिष्ठा शिकविली फुकटच कोणाच्या घरचं गाडगे महाराजांनी खाल्लं नाही. अशा महान संतांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
आधुनिक विद्रोही संत: गाडगेबाबा.
कर्मयोगी संत गाडगेबाबा म्हटलं की हातात खराटा व झाडू घेतलेले स्वच्छतेचे दुत अशी त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. स्वच्छतेचे कार्य आणि विद्रोही असणे याचा कुठे संबंध येतो? असा कदाचित वाचकांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ शकतो. गाडगेबाबांनी जसे स्वच्छतेच्या संदर्भात म्हणजेच रस्त्यावरील घाण काढून ग्राम स्वच्छता करण्याचे जसे काम केले. तसेच हजारो वर्षापासून मेंदूतील बुरसटलेल्या विचारांची घाण काढून मेंदू स्वच्छ करण्याचे काम सुद्धा केलेले आहे. तत्कालीन साहित्यकार प्र.के.अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, तसेच गाडगेबाबांनी काढलेले ‘ जनता जनार्धन मासिक ‘ वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतो. एकही दिवस शाळेत न गेलेले गाडगेबाबा एका मासिकाचे संस्थापक संपादक होऊ शकतात, हे आपल्या बहुजनातील उच्च- शिक्षितांनी समजून घेणे आवश्यक आहे. हि कृती सुद्धा एक विद्रोहच दर्शविते.
भारतीय लोकांचा संताकडे बघण्याचा दृष्टिकोन आध्यात्मिक अंगाने अधिक आहे. त्यामुळे त्यांनी अंधश्रध्दा, बलिप्रथा, जातीभेद याविरुद्ध जो आवाज उठविला किंवा ईश्वरा विषयी त्यांनी जी संकल्पना मांडली त्याकडे साफ दुर्लक्ष केल्या जातो. खरं तर संत रोहिदास, कबीर, चक्रधर, महात्मा बसवेश्वर, नामदेव, तुकाराम हे सामाजिक परिवर्तनाच्या कार्यातील विद्रोही संत आहेत आणि त्याच मांदियाळीत नाव म्हणजे संत गाडगेबाबा.
स्वतः पासुन सुरुवात : परंपरेला छेद दिला :
गाडगेबाबा ज्या जातीतून येतात त्या जातीत कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी नवस म्हणून दारु व मटणाचे जेवण देण्याची प्रथा होती.त्या प्रथेला छेद देत गाडगेबाबांनी मुलीच्या बारशाला दारु व मटणाएवजी गोड जेवणाची पंगत घातली तेव्हा लोकांनी त्यांना विरोध केला,जातीच्या बाहेर काढण्याच्या धमक्या दिल्या.परंतु कशालाही न जुमानता त्यांनी परंपरा, दैव- दैववाद, अंधश्रद्धा झुगारुन मुलीचा बारसा केला. त्या काळात समाजविरोधात जावून परीवर्तनीय कृती करणे ही साधी बाब नव्हती. ती कृती त्यांनी केली. म्हणूनच ते विद्रोही ठरतात. गाडगेबाबांनी ” बोले तैसा चाले ” म्हणण्यापेक्षा ” चाले तैसा बोले ” अशी सुरुवात केली.
व्यसनावर प्रहार :- गाडगेबाबांच्या वडिलांची सुरुवातीला आर्थिक परिस्थिती अत्यंत चांगली होती.परंतु रुढी,परंपरा,कर्मकांड यात गुरफटून ते दारुच्या आहारी गेले आणि कुटुंबाला कर्जबाजारी करुन मृत्यूला कवटाळले. वडीलांच्या व्यसनाधीनतेमुळे मृत्यू झाला. हे गाडगेबाबा जाणून होते, म्हणुन त्यांनी कायम तरुणांना व्यसनाधीनतेपासून दूर राहण्याचा संदेश दिला. तरुणांना शिक्षणाकडे वळण्याचा मार्ग सांगितला.
महात्मा फुलेंच्या शब्दात सांगायचं झाल्यास *” थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा, तोच पैसा भरा ग्रंथासाठी ” कीर्तनातून व्यसनाधीनतेवर हल्ला करताना ते म्हणत,” दारु गांजा मत पी यारो ! अक्कल गुंग हो जाती है ! अपने करमका दाम खरचके ! मुखमे मिठीया पडती हैं !
एकीकडे गाडगेबाबांचे नाव घ्यायचे, प्रबोधनकारांचा वारसा सांगायचा आणि किराणा दुकानातून दारु विकण्याची परवानगी देण्याचे निर्णय घ्यायचे म्हणजे सरकारची मती गुंग झाली आहे असं म्हणण्याला वाव आहे.महामानवाचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या जयंतीला डीजेच्या तालावर दारु पिऊन गुंग होऊन नाचणाऱ्या आजच्या तरुणांनी जयंत्या – मयांत्याना नचाण्यापेक्षा महामानवाचे चरित्र वाचून चारित्र्य घडविणे आवश्यक आहे.
अंधश्रद्धेवर प्रहार :- गाडगेबाबांच्या अंधश्रद्धेच्या कार्याबाबत बोलायचे झाल्यास
” स्वच्छ करी बाबा ! डोक्यातील घाण! झाडून पुसून ! अंधश्रद्धा !!
गाडगेबाबा म्हणजे आधी सांगितले मग केले. वृत्तीप्रमाने वागणारे समाज सुधारक होते.याचे उदाहरण म्हणजे आधी सांगितल्या प्रमाणे प्राणी बळी न देता मुलीचा केलेला बरसा. तसेच गाडगेबाबांनी अमरावती येथे नारायणगुरूच्या यज्ञामध्ये होणारी पशुहत्या आंदोलन करुन थांबवली. बहिरमच्या जत्रेत मोठ्या प्रमाणावर बकऱ्यानची बळी थांबवली.अंगात देव आल्याचे सोंग करणाऱ्यांना नी अंगारे देणाऱ्यांना तुकाराम महाराजांच्या शब्दात फैलावर घेतांना म्हणतात, ” अंगी दैवत संचारे! मग तिथे काय उणे!! म्हणजे गाडगेबाबा अगदी मर्मावर बोट ठेवत. संताच्या नावाचा फक्त उदो- उदो करुन किंवा त्यांच्या आरत्या भजन करुन चालणार नाही तर त्यांनी सांगितलेल्या विचारावर पाऊल ठेऊन नवीन मानव धर्माच्या शोधकरिता झगडायला पाहिजे.
अलीकडे लग्न झाल घाल सत्यनारायण, मुलगा झाला घाल सत्यनारायण, घर बांधलं घाल सत्यनारायण, नौकरी लागली घाल सत्यनारायण, एवढ सत्नारायणाचे स्वरूप बोकाळला आहे.सत्यनारायण घालणाऱ्यांनी एकदा गाडगेबाबांनी मुंबई पोलिसांसमोर दिलेले शेवटचे कीर्तन नक्कीच वाचावे आणि मगच सत्यनारायणाच्या मागे लागावे. या संदर्भात गाडगेबाबा ( मी नाही ) म्हणतात, सत्यनारायणाची प्रसाद खाल्याने कलावती व लीलावतीच्या साधुवा ण्याची समुद्रात बुडालेली बोट जर वर येत असेल तर दोन महायुद्धात इंग्लंड, जर्मनी,फ्रान्स, अमेरिकेच्या शेकडो मोठमोठ्या बोटी महासागरात बुडाल्या आहेत तर त्या बाहेर काढण्यासाठी त्यांना सत्यनारायणाची सोपी पद्धत कोणी का सांगितली नाही.
जे लोक मुले होण्याकरिता नवस करतात, अश्या लोकांना नवस कसं वायफळ आहे हे सांगताना ते म्हणतात, ” नवसे कन्या – पुत्र होती ! मग का करणे लागे पती !! परंतु आजही मुल होण्यासाठी उच्चशिक्षित व त्यातही वैद्यकिय क्षेत्रातील लोकं नवस करताना बघतो तेव्हा खरंच आम्ही विज्ञान हा जिवन जगण्याकरिता शिकल
की गुनपत्रिकेवरील फक्त अंक वाढविण्याकरिताच शिकलं ? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
तीर्थात आणि दगडात देव
शोधनाऱ्यांविषयी :- तीर्थयात्रेला गेल्याने पुण्य मिळुन मागील जन्मातील पापे धुतल्या जातात ही समज कशी खोटी आहे या संदर्भात गाडगेबाबा कीर्तनातून तुकोबारायांच्या अभंगाचा दाखला देत सांगतात ” तिर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी! तिर्तिक्षेत्रे गेले, दाढी – मिशी बोडून आले ! पाप तैसेचि राहिले, दाढी – मिशिने काय केले !! संत तुकडोजी महाराज सुद्धा यासंदर्भाने म्हणतात ” तुझ्या गावाचं नाही का तीर्थ, तू कशाला रिकामं फिरतं ! एवढ साध्या सरळ भाषेत आम्हाला महामानवानी सत्य – असत्य ओळखन्यास सांगितलेले आहे.परंतु आम्ही मोबाईल ओल्ड मॉडेल झाला म्हणून वर्षाला मोबाईल बदलवणारे आपल्या मेंदूतील जुन्या बुरसटलेल्या मानसिकतेला बदलण्यास किंवा अपडेट करण्यास तयार नाही.शाळेची पायरी न चढणारे गाडगेबाबा पुढे देवाच्या नावावर बाजार मंडणाऱ्यांना फटकारताना म्हणतात, ” शेंदूर माखूनिया धोंडा, पाया पडती पोरे – रांडा ! देव दगडाचा केला, गवंडी त्याचा बाप झाला ! सोडूनिया खऱ्या देवा, करी म्हसोबाची सेवा !! विज्ञानाच्या वर्गात न बसलेले संत आम्हाला अगदी सोप्या भाषेत विज्ञान शिकवितात. तर विज्ञान शिकुन प्राध्यापक, डॉक्टर, इजिनियर,वकील, शास्त्रज्ञ,राजकीय नेते अंधश्रद्धेच्या आहारी जाताना दिसतात. आपल्या पेक्षा कमी ज्ञान आणि वयाने लहान असणाऱ्या पुरोहिताचे पाया पडताना यांना पाहिले की मन विषिंन होते. मनात प्रश्न पडतो की खरंच आम्ही विज्ञान युगात आहोत की पौरानिक काळात जगत आहोत.पश्चिमात्य देशा प्रमाणे आम्हाला आमच्या देशातही नवं नवीन शोध लागावेत .आमच्या मुलांनीही अंतराळात फिरायला जावे. असे वाटत असेल तर फक्त गुणपत्रिकेवरील गुणांचा विचार न करता वास्तव जिवन गुणवान कसं होईल या दृष्टीने त्यांना गुणवान होण्यासाठी प्रयत्न करु या.
मित्रांनो कर्ज काढून सणवार साजरे करू नका.भुकेलेल्यांना अन्न दया, दारु पिऊ नका, दगडाच्या देवाच्या आणि नवसाच्या नांदी लागू नका, तो तुमचं काही भल करणार नाही.” जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ! असं सांगुन खरा देव कोणता ? असे सांगणाऱ्या कर्मयोगी संत गाडगेबाबांना विद्रोही संत म्हणणेच योग्य होईल.
अशा विद्रोही कर्मयोगी गाडगेबाबांना १४६ व्यां जयंतीदिनी विनम्र अभिवादन.