
दक्षिण आफ्रिकेनं पहिली फलंदाजी करताना २६९ धावा केल्या. भारताला विजयासाठी २७० धावांची आवश्यकता होती. खरे तर दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत हे आव्हान पार करणे कठीण मानले जात होते. पण विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे या धुरंधरांनी ते यशस्वीपणे पार केले आणि डर्बनमध्ये भारताची विजयी पताका फडकावली. पण डावाची चांगली सुरुवात करून देणारा सलामीवीर शिखर धवन अर्थात ‘गब्बर’ विराट कोहलीवर प्रचंड भडकला होता. कारण विराटच्या एका चुकीच्या ‘कॉल’मुळे फार्मात असलेला शिखर धावबाद झाला. त्यानंतर मैदानावरच त्याने कोहलीला ‘राग’ दिला. तसंच मैदानातून जातानाही त्याची बडबड सुरूच होती. ड्रेसिंग रुममध्ये तो रागातच बसला होता. फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्याशी तो बोलत होता. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर संताप दिसून येत होता. मात्र, विराट आणि रहाणेच्या फलंदाजीमुळं भारत विजयी पथावर दिसू लागला तसतसा त्याचा राग शांत होत गेला. कोहलीनं शतक झळकावल्यानंतर खिलाडुवृत्तीनं त्यानं राग बाजूला सारून हसतमुखानं टाळ्या वाजवून कोहलीच्या झुंजार खेळीचं कौतुक केलं.








