आईनेच केली दिव्यांग मुलाची हत्या, स्वतःही संपविले जीवन

60

आईनेच केली दिव्यांग मुलाची हत्या, स्वतःही संपविले जीवन

मृत महिला आपल्या सांसारीक जीवनाने कंटाळली असून मुलगा दिव्यांग असल्याने त्रस्त होऊन जीवन संपवित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अमरावती:- चांदूरबाजार   जन्मदात्या आईनेच दिव्यांग मुलाची हत्या करून स्वतःही आत्महत्या केली. हृदयाचा थरकाप उडवून देणारी ही घटना शहरातील गुलाबराव महाराजनगर येथे सोमवारी रात्री घडली. हत्या व आत्महत्या करणारी महिला मूळची यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्‍यातील वरुड या गावची  रहिवासी होती. माधुरी गजानन शिंगणपुरे वय 35, असे या महिलेचे नाव असून तिला ऋषी शिंगणपुरे वय 10 मुलगा असून तो दिव्यांग होता. आपल्या संसाराला कंटाळून सदर महिला आपल्या दिव्यांग मुलाला घेऊन प्रथम अमरावती व नंतर चांदूरबाजार येथे बसने दाखल झाली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सदर महिला गुलाबबाबानगरमध्ये गेली व तेथे आपल्या मुलाच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. तसेच स्वतःच्या हातावर व मानेवर ब्लेड मारून जीवन संपवले.

पोलिसांनी घटनास्थळावरून लेडीज बॅग व मोबाईल जप्त केला. घटनास्थळी सापडलेल्या बॅगमध्ये मोबाईल व अमरावती-चांदूरबाजार एसटी बसची तिकिटे सापडलीत. त्यावरून दोघांचीही ओळख पटली. पोलिसांनी घटनास्थळी आढळलेल्या मोबाइलवरून नातेवाइकांशी संपर्क केला. यावेळी मृतक महिलेने आर्णी येथील बहिणीकडे मृत्यूपूर्वी चिट्ठी लिहून ठेवली होती. रात्री वेळाने दोन्ही मृतांचे नातेवाईक पोलिस ठाण्याला पोहोचून ती चिट्ठी पोलिसांना दिली.

चिठ्ठीनुसार, मृत महिला आपल्या सांसारीक जीवनाने कंटाळली असून मुलगा दिव्यांग असल्याने त्रस्त होऊन जीवन संपवित असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यावेळी पोलिसांनी मृत महिला माधुरी गजानन शिंगणपुरे यांच्या विरोधात खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पंकज दाभाडे, वीरेंद्र अमृतकर, महेश देशमुख करीत आहेत.