अलर्ट सिटीजन फोरमचा समाजोपयोगी महिला दिन साजरा
पूनम पाटगावे
मुंबई प्रतिनिधी
मुंबई :- नुकतेच 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यात महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यात आला. मुंबईसह इतर ठिकाणी दरवेळेस नवनवीन समाजपयोगी उपक्रम घेऊन कार्यरत असणाऱ्या अलर्ट सिटीझन फोरम या संस्थेच्यावतीने समाज उपयोगी महिला दिन साजरा करण्यात आला.
महिला दिनाचे औचित्य साधून आरे काॅलनी येथील आदिवासी पाड्यामध्ये श्रमिक महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिलांच्या मासिक पाळी आरोग्य विषयक काळजी घेत प्रती महिलेस किमान 6 महिने पुरतील असे पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले व त्याचे महत्व समजून देण्यात आले. याबरोबरच महिलांना आरोग्य, सौंदर्य विषयक घरगुती उपाय योजना मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. यात आजच्या आधुनिक जगात महागड्या सौंदर्य प्रसाधनांचा अवाढव्य खर्च टाळत, घरगुती साहित्य वापरून त्वचेची व चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी, याचे मार्गदर्शन उपस्थित महिलांना करण्यात आले. वेगवेगळ्या केशभूषा कशा कराव्यात, याचे देखील प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. तसेच प्रश्नोत्तरे पद्धतीने महिलांच्या शंकाचे निरसन करण्यात आले. रोजगार म्हणुन या कलेचा कसा उपयोग होईल, या बद्दलची माहीती ही देण्यात आली.
त्यानंतर उपस्थित महिला व मुलांना खाऊ वाटप केले गेले. लहान मुलांनी तारपा नृत्याचे सादरीकरण करून त्यांचा आनंद व्यक्त केला आणि कार्यक्रमास सुंदर स्वरूप लाभले. हा महिलादिन विशेष उपक्रम उत्साहात साजरा करण्याकरिता सौंदर्य तज्ञ सिद्धी देसाई व अंजली गावडे तसेच कार्यक्रम नियोजकर्त्या सौ.शीतल भोईर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याबद्दल अलर्ट सिटीझन फोरम संस्थेच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.