आंतरजातीय विवाह केल्याने सुनावला एक लाखांपर्यंतचा दंड.
गोंदिया :- पुरोगामी महाराष्ट्राला लाजविणार घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. दुसऱ्या समाजाच्या मुलीशी प्रेमविवाह करणे एका प्रियकराला भारी पडले असून कतिया समाजाच्या लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकत त्यांना वाळीत टाकले आहे. इतकेच नव्हेतर 50 हजार ते 1 लाख रुपये दंड भरण्याचे फर्मान देखील काढले आहेत. विशेष म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पालक जिल्ह्यात ही घटना घडली असून याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदिया तालुक्यातील जरताळ येथील गुलाब रमेश अजितवार हे कतिया समाजाचे असून त्यांनी कुणबी समाजाच्या मुलीशी नागपूर येथे 17 ऑक्टोबर 2020 ला प्रेमविवाह केला. त्यानंतर 9डिसेंबरला ते गावात परतले. त्यानंतर दुसऱ्या जातीच्या मुलीशी लग्न केल्यामुळे गावात 15 डिसेंबरला कतिया समाजाची बैठक लागली. त्यामध्ये दंड स्वरुपात 1 लाख ते 50 हजार रुपये रक्कम मागण्यात आली. मात्र, आपण गरीब असल्याने केवळ एक हजार रुपये भरू शकत असल्याचे गुलाब यांनी सांगितले. त्यानंतर मनोज अजितवार ही व्यक्ती त्याच्या मदतीसाठी धावून आली.
आंतरजातीय विविह करणे ही प्रथा सुरूच असून केवळ 50 रुपये दंड घ्या, असे मनोज यांनी म्हणताच त्यांनाही मारहाण करण्यात आली. अखेर पैसे भरू न शकल्याने पीडित गुलाब अजितवार व त्यांच्या कुटुंबीयांना कतिया समाजाने बहिष्कृत केले आहे. तसेच त्यांच्या लहान-लहान मुलांनाही आपल्या घरात प्रवेश नाकारण्यात येत आहे. याप्रकरणी मनोज अजितवार यांच्या तक्रारीवरून तिघांविरोधात गंगाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. पी. जगदाळे यांनी दिली.